टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 मे 2021 – सध्या अनेकांच्या घरी गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी वापरतात. मात्र, जो गॅस वापरला जातो, तो देखील खूप धोकादायक असल्यामुळे खबरदारी घ्यावी लागते. तरीही गॅस सिलेंडर स्फोटच्या घटना घडत असतात. अशावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. पण, जर सिलेंडरचा स्फोट होऊन नुकसान झाल्यास सुमारे 6 लाखांचा विमा मिळतो. मात्र, अपघात झालेलं ठिकाण आणि कंपनीकडे दिलेल्या माहितीमधील पत्ता एक असणं आवश्यक आहे.
गॅस सिलिंडरचा अपघात आणि त्यावरील विमा याबाबत अनेकांना माहिती नसते. जर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला तर संबंधित तेल कंपनीकडून लाखो रुपयांचा विमा मिळण्याची तरतूद केलेली असते.
भारतात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), भारत पेट्रोलियम (BPCL) या तीन कंपन्या गॅस सिलिंडरच्या स्फोटावर सुरक्षा विमा देत असतात. या इंशुरन्स पॉलिसीचे नाव ‘पब्लिक लायबिलिटी इंशुरन्स असे आहे. पब्लिक लायबिलिटी इंशुरन्स प्रति इव्हेंटसाठी 50 लाखांपर्यत, व्यक्तीसाठी 10 लाखांपर्यंत व एक वर्षात 100 कोटी रुपयांपर्यंत असतो.
हिंदुस्ताना पेट्रोलियमकडून याबाबत एक नोटिफिकेशन जारी केलंय. यात पर्सनल एक्सिडंट कव्हर 6 लाख रुपयांपर्यंत मिळतो. मात्र, वैद्यकीय खर्चाच्या रुपात 30 लाख रुपयांपर्यंत मिळतो. प्रति व्यक्ती ही मर्यादा 2 लाख रुपये आहे. तात्काळ मदतीच्या रुपात 25 हजार रुपये मिळत असतात.
जर संपत्तीचे नुकसान झालं असेल तर प्रति अपघात 2 लाख रुपये मिळतात. हा लाभ केवळ नोंदणीकृत ग्राहकांना नोंदणी केलेल्या पत्त्यासाठी मिळतो. म्हणून तुम्ही ज्या पत्त्यावर गॅस कनेक्शन घेतलंय ते ठिकाण बदललं तर गॅस कंपनीकडील पत्त्यात वेळीच बदल करुन घ्यावा.
जर तुमचा नोंदणीचा पत्ता व अपघात झालेलं ठिकाण हे वेगळं असेल तर तुम्हाला यापैकी कोणताही लाभ घेता येणार नाही, हाही लक्षात ठेवावे.