टिओडी मराठी, दि. 19 मे 2021 – तौत्के चक्रीवादळाचा गुजरात राज्याच्या पश्चिम किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. यानंतर झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील या भागासाठी सुमारे 1 हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली. याशिवाय देशभरात तौत्के चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर, जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
गुजरात राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीचा ताळेबंद लावण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाणार आहे, असे पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट केलं आहे.
कोकण किनारपट्टीशी समांतर गेलेल्या तौत्के चक्रीवादळामुळे किनारी भागात पावसानं हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांमधला वीजपुरवठा, रस्ते वाहतूक विस्कळीत झालीय. मात्र, गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलेल्या या चक्रीवादळाचा तडाखा सीमा भागातल्या गावांना बसलाय.
चक्रीवादळाचा लँडफॉल गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर सुरू झालाय. तेव्हा किनारी भागातल्या एकूण २४०० गावांमधला वीजपुरवठा खंडित झाला. वीजेचे हजारो खांब उन्मळून पडले.
या भागातले सुमारे १६० रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच सुमारे ४० हजार झाडं उन्मळून पडलीत. यासह १६ हजार ५०० घरांचं नुकसान झालं असून किनारी भागातून २ लाख नागरिकांचं सुरक्षितस्थळी हलवलं आहे.
या दरम्यान, गुजरातसह महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांना हि या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. त्यामुळे देशात ज्या ज्या ठिकाणी चक्रीवादळाचा फटका बसला आहे, तिथे मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर, जखमींसाठी ५० हजार रुपयांच्या मदतनिधीची देखील घोषणा पंतप्रधानांनी केलीय.