टिओडी मराठी, मुंबई, दि. 19 मे 2021 – नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने मुंबईच्या समुद्रकिनारी भागात धुमाकूळ घातला. कोकणात अनेक गावात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील जाणार आहेत, अशी घोषणा त्यांनी केली आहे. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकण दौऱ्यावर जाणार आहे, असे म्हंटले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकणातील नुकसानग्रस्त भागाची लवकर पाहणी करणार आहे. आज महाविकास आघाडी सरकारची बैठक बोलाविली आहे. या कॅबिनेट बैठकीत राज्यात कोणकोणत्या भागात किती नुकसान झाले आहे?. याची चर्चा केली जाणार आहे. त्यासह काय मदत जाहीर करायची? याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण भागाच्या दौऱ्याचे नियोजन केले जात आहे. याबद्दल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस आजपासून तीन दिवस कोकणातील तीन जिल्ह्याचा दौरा करत आहेत. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने हि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार या जिल्ह्यामध्ये उद्या दौरा करणार आहेत.
तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि नुकसानग्रस्त यांना तातडीने मदत मिळण्यासाठी विजय वडेट्टीवार मंत्री आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन हे दि. 20 ते 23 मे या दरम्यान चार दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. तसेच गुरुवारी ताम्हणी, मानगड, मसळा, श्रीवर्धन, शुक्रवारला रत्नागिरी जिल्हा, शनिवारला सिंधुदुर्ग जिल्हा, रविवारला पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पाहणी करून आढावा बैठक घेणार आहेत.