टिओडी मराठी, दि. 16 मे 2021 -नशीब अजमावण्यासाठी बरेच लोक काहीं ना काही प्रयत्न करत असतात. लॉटरी हा देखील त्याच्याच भाग आहे. लॉटरीमुळे नशीब बदलेल अशी अशा ठेवून खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. जर एखाद्याला लॉटरी लागली तर आनंद गगनात मावत नाही. पण, त्याचवेळी एखादी चूक झाली तर तोच आनंद निराशेत बदलल्याच अनुभव देखील काहींना आला असेल. याचाच प्रत्यय नुकताच कॅलिफोर्निया येथील एका महिलेला आलाय.
या महिलेनं सुमारे 190 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली; पण चुकून तिकीट ठेकलेली पँट तिने धुवून टाकल्याने तिकीट खराब झाले. त्यामुळे ‘कशी नशिबाने थट्टा मांडली’ असे म्हणण्याची वेळ आली.
हे लकी तिकीट लॉस एंजेलिसच्या एका दुकानातून विकले होते. बुधवारी एक महिला ‘त्या’ स्टोअरवर आली होती, तिने ही रक्कम जिंकल्याचा दावा केला होता. तिच्या म्हणण्यानुसार तिने ते तिकिट खरेदी केले होते.
तसेच त्या तिकिटाचा नंबर देखील लिहून ठेवला होता, यानंतर तिने ते तिकीट पँटच्या खिशात ठेवले आणि विसरून गेली. काही दिवसांनी तिने ती पँट लाँड्रीत धुण्यासाठी दिली. यामुळे ती पँट धुतली गेल्याने ते तिकिट खराब झाले.
दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला तिकीट खरेदी करत असताना दिसली. ही महिला येथून नेहमी तिकीट खरेदी करत होती, त्यामुळे दुकानातला स्टाफदेखील तिला ओळखत होता. मात्र, तिने नेमके तेच तिकीट कशावरून खरेदी केले?, असा पेच अधिकाऱयांपुढे निर्माण झालाय.
सध्यातरी इतर कोणीही या रकमेवर दावा करण्यासाठी पुढे आले नाही. लॉटरी कंपनीचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करताहेत. जर कुणी रकमेवर दावा करण्यासाठी पुढे आले नाही तर ही रक्कम कॅलिफोर्निया पब्लिक स्कूलला दान म्हणून दिली जाणार आहे.