टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 मे 2021 – उपचारादरम्यान रुग्णांचे काही कमी जास्त झाल्यास नातेवाईकांकडून डॉक्टर, कर्मचाऱ्यावर अनेकदा हल्ले होतात. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज चिंता व्यक्त केलीय. आपल्याला डॉक्टरांचे संरक्षण करायला हवे, सध्याच्या काळात ते प्रचंड काम करत आहेत, जर आपण त्यांचे संरक्षण करू शकलो नाही तर, आपण आपल्या कामात कमी पडतोय, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्तींनी सरकारला सुनावले आहे.
डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यावर हल्ल्याच्या घटना महाराष्ट्रात अधिक प्रमाणात घडल्या आहेत. आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यावरील हिंसाचार रोखण्यासाठी न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत डॉ. राजीव जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. त्यावेळी सरकार अशा घटनांना आळा घालण्यासाठी 2010 च्या कायद्यासह इतर कायदेशीर तरतुदींची अंमलबजावणी करण्यात शासन अपयशी ठरले आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला.
त्यावर न्यायमूर्ती म्हणाले, सध्या डॉक्टर्स २४ तास काम करत आहेत. त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यायलाच हवी. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दुसऱ्या खंडपीठाने यासंदर्भात दिलेल्या आदेशांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आणि सुनावणी पुढील आठवडय़ापर्यंत तहकूब केली.