टिओडी मराठी, पुणे, दि. 12 मे 2021 – येरवडा वाहतूक विभागातील एका पोलीस उपनिरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. जाहिरात फलक लावण्याकरीता ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासाठी सुमारे 3 लाख 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या आरोपावरुन येरवडा वाहतूक विभागातील एक पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागच्या जाळ्यात अडकला आहे.
बसवराज धोंडोपा चित्ते असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून चित्ते हे येरवडा वाहतूक विभागात उपनिरीक्षक म्हणून नेमणूकीला आहेत.
तक्रारदार यांना जाहिरात फलक लावण्यासाठी वाहतूक विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज होती. त्यासाठी त्यांनी पोलिसांकडे अर्ज केला होता, ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे सुमारे ३ लाख ६० रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने याची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची 16 एप्रिल, 20 एप्रिल आणि 3 मे रोजी पडताळणी केली. त्यात चित्ते यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, प्रत्यक्ष सापळा कारवाई होऊ शकली नाही, तरीही लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने शेवटी लाच लुचप्रतिबंधक विभागाकडून लाच मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर करीत आहेत.