दिल्ली | ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीबद्दल आपण दोषी नसून याप्रकरणी माफी मागणार नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. याप्रकरणी फिर्यादीशी तडजोड करायची असती तर ती यापूर्वीच केली असती, असेही त्यांनी सांगितले. मानहानी खटल्यात सुरत महान्यायदंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी विनंती राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली.
लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींअंतर्गत गुन्हेगारी प्रक्रिया आणि त्याच्या परिणामाचा वापर करून याचिकाकर्त्यांचा दोष नसतानाही त्याच्यावर माफी मागण्यासाठी दबाव टाकला जात आहे, हा न्यायालयीन प्रक्रियेचा अतिशय गैरवापर आहे असा आरोप राहुल यांनी केला आहे.
हेही वाचा” …पृथ्वीराज चव्हाण सभागृहात संभाजी भिडेंवर तुटून पडले; म्हणाले…”
राहुल यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की, याचिकाकर्त्यांला गुन्ह्यासाठी दोषी असल्याचे मान्य नाही आणि या प्रकरणात माफी मागून तडजोड करायची असती तर आपण ते फार पूर्वी केले असते. पूर्णेश मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रति-प्रतिज्ञापत्राच्या उत्तरादाखल राहुल गांधी यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
आपल्या भाषणामध्ये ‘मोदी’ आडनावावरून कोणत्याही समुदाय किंवा समाजाचा उल्लेख केलेला नाही आणि त्यामुळे संपूर्ण ‘मोदी’ समुदायाची मानहानी केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे राहुल यांनी म्हटले आहे. ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे’ असे वक्तव्य राहुल यांनी कर्नाटकातील कोलार येथे २०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचारसभेमध्ये केले होते. त्यावरून भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी खटला दाखल केला होता.