मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यपदावरून हकालपट्टी केल्याचं सोमवारी ( ३ जुलै ) जाहीर केलं. सुनील तटकरे यांची या पदावर नियुक्ती केल्याची घोषणा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली. नव्या नेमणुका जाहीर करून मूळ राष्ट्रवादी पक्षाला आव्हान देण्यात आलं होतं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
जयंत पाटील म्हणाले, “आमची ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी’ आहे. महाराष्ट्रात अलीकडे नवीन झालीय, ती ‘नोशनलिस्ट काँग्रेस पार्टी’ आहे. नोशनल पार्टीने मला निलंबित केलं काय, ठेवलं काय. मी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे.”
हेही वाचा” …बंडखोरीनंतर पहिली मंत्रीमंडळ बैठक, शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून ८ महत्त्वाचे निर्णय”
पक्षाला सत्तेत आणून गुरूदक्षिणा दिली, असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं. याबद्दल विचारल्यावर जयंत पाटील यांनी म्हटलं, “त्यांनी केलेल्या कृतीचं वेगवेगळ्या प्रकारे समर्थन करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय, हे सर्वांना माहिती आहे. आम्हाला त्यांच्याबाबत काहीही बोलायचं नाही.”
तर “मी राष्ट्रवादी कॉँग्रेस उपाध्यक्ष असताना प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची नियुक्ती केली होती. २०२१ मध्ये पाटील यांना मीच मुदतवाढ दिली होती. याच अधिकारात मी पाटील यांना बदलून तटकरे यांची नियुक्ती करीत आहे,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.