मुंबई | अजित पवार यांनी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं. अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने हे पद कोणाकडे जाणार असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अवघ्या काहीच तासांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवली आहे. तसंच, विधिमंडळाच्या प्रतोदपदीही आव्हाड त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे दोन तृतीयांश आमदार गेल्यानंतर आता विरोधी पक्षनेता काँग्रेसचा होईल असं बोललं जात आहे. यावर आता स्वतः शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवार यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी शरद पवार यांना विचारण्यात आलं की, आता विधानसभेचा विरोधी पक्षनेता काँग्रेसचा होईल, अशी चर्चा आहे, त्याबद्दल तुमचं मत काय. यावर शरद पवार म्हणाले, आज ज्यांच्याकडे विधानसभेचे सर्वाधिक सदस्य आहेत तो पक्ष या पदाची मागणी करू शकतो. ज्या पक्षाकडे सर्वाधिक आमदार त्यांचा नेता या पदावर बसू शकतो. महाराष्ट्र विधानसभेची आजची माझी जी माहिती आहे त्यानुसार बहुतेक काँग्रेस पक्षाकडे सर्वात जास्त सदस्य (विधानसभा) आहेत. सगळ्यात जास्त सदस्य त्यांच्याकडे असतील आणि विरोधी पक्षनेतेपदाची त्यांची मागणी असेल तर त्यांची ती मागणी रास्त आहे.
हेही वाचा” …काल अजित पवारांसोबत असलेले कोल्हे आज शरद पवारांच्या सोबतीला, म्हणाले…”
दरम्यान, अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात आल्याबाबत प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले तो अधिकार जयंत पाटलांचा आहे. “त्यांना अपात्र करायचं की नाही याचा विचार मी करणार नाही. तो विचार जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी करतील. मी कुणाबद्दल नाराजी व्यक्त करत नाही. काही सहकाऱ्यांनी जे केलं ते योग्य नाही. पण त्यासाठी मी मनात द्वेष ठेवून राजकारण करत नाही.