नवी दिल्ली | विश्वचषक २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे. वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया चार देशांविरुद्ध मालिका खेळणार आहे. या यादीत आयर्लंडच्या नावाचाही समावेश आहे. जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये आयर्लंडचा दौरा करणार आहे. याबाबत क्रिकेट आयर्लंडने वेळापत्रक जाहीर केले आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे.
हेही वाचा” …रोहिणी खडसेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…”
विशेष म्हणजे गेल्या वर्षी भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली होती. भारताने ही मालिका २-० ने जिंकली होती. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने या मालिकेतील पहिला सामना ७ विकेटने जिंकला होता. यानंतर दुसरा सामना ४ धावांनी जिंकला होता. ही मालिका जूनच्या शेवटच्या आठवड्यात खेळवली गेली. पण यावेळी ऑगस्टमध्ये खेळवली जाणार आहे. गतवर्षी पावसामुळे सामन्यांवर परिणाम झाला होता.
टीम इंडियाने २०२२ च्या मालिकेत संजू सॅमसन आणि दीपक हुडा यांचा संघात समावेश केला होता. हुड्डा दोन सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने १५१ धावा केल्या होत्या. तर संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर होता. सॅमसनने एका सामन्यात ७७ धावा केल्या. भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल हे गोलंदाज संघात होते. भुवनेश्वरने दोन सामन्यांत दोन बळी घेतले. तर चहलने एका सामन्यात एक विकेट घेतली होती.
मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना – १८ ऑगस्ट – संध्याकाळी ७:३० वा. मालाहाइड
दुसरा सामना – २० ऑगस्ट – संध्याकाळी ७:३० वा. मालाहाइड
तिसरा सामना – २३ ऑगस्ट – संध्याकाळी ७:३० वा. मालाहाइड