मनसेनी फक्त मुंबई मनपा जिंकण्याची स्वप्न पहावी, त्यांचं अस्तित्व नाही, निवडणुकीच्या तोंडावर सुपारी घेवून काम करायचे काम राज ठाकरे (Raj Thackeray) गेली काही वर्षे करतात. राज ठाकरे फक्त नक्कल करून राजकारण करतायत, बाळासाहेबांचं नाव घेऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) नक्कल करायची. पायाला ठेच लागली तरी तुम्ही मुंबईला अॅडमिट होता, उद्धव ठाकरेंच नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर होतंय ही राज ठाकरे यांची पोटदुखी आहे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई गटाध्यक्षांच्या एका मेळाव्याला संबोधित केलं होतं, त्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंच्या आजारपणावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं होतं. त्यासोबतच तुम्ही कामाला लागा, तुम्हाला महापालिका देण्याची जबाबदारी माझी असं आवाहन देखील त्यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं होतं. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
राज्यात काही दिवसात विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक (Election of Mumbai Municipal Corporation) देखील तोंडावर आहे, या निवडणुकीत मनसेची भूमिका महत्त्वाची असणार आहे. यापूर्वी मनसे सर्व जागा स्वबळावर लढणार, असे संकेत मनसेच्या वतीने देण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे मध्ये वाक् युध्द रंगल्याचे चित्र आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या भाषणापूर्वी मुंबई महानगरपालिकेवर त्याचबरोबर उद्धव ठाकरेंवर देखील हल्लाबोल केला होता. इतरांना खोके म्हणून बोलता, तुम्ही कपाटं कुठे ठेवली, असं म्हणत त्यांनी देखील जोरदार हल्लाबोल केला होता.