TOD Marathi

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) नुकताच विदर्भ दौरा केला. या विदर्भ दौऱ्यात त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी संवाद मेळावा घेतला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करत असतानाच स्थानिक खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) आणि आमदारांवर देखील आगपाखड केली. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार प्रतापराव जाधव हे आता शिंदे गटात आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) शिंदे गटातील आमदार खासदारांवर टीका केली. त्यासोबतच स्थानिक खासदार म्हणून प्रतापराव जाधवांवर देखील अप्रत्यक्ष चांगलीच टीका केली.

त्यावर प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी जोरदार प्रत्यूत्तर उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा लोकसभा लढवावी असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे असा वाद रंगताना दिसतोय. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देतानाच आपण शिवसेनेतच आहोत, न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत. लोकशाहीत संख्येला महत्त्व असतं. 56 पैकी 40 आमदार आमच्याकडे आहेत. 18 पैकी 13 खासदार आमच्याकडे आहेत. जिल्हाप्रमुख, संघटना देखील आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेतच आहोत, असे देखील त्यांनी म्हटलं आहे.

संविधान दिनाच्या दिवशीच उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर होते तर त्याच दिवशी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या आमदार खासदारांसह गुवाहाटी दौऱ्यावर होते, त्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून देखील उद्धव ठाकरे यांनी चांगलीच टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी केलेली टीका प्रतापराव जाधव यांना झोंबली नसेल तर नवलच, त्यावर अपेक्षेप्रमाणे प्रतापराव जाधव यांनी प्रत्यूत्तरही दिलं. मात्र, प्रतापराव जाधव यांच्या या प्रत्यूत्तरावर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुकत्याचं ठरणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर ठाकरे गटाकडून विनायक राऊतांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) टीका केली होती.