पुणे: प्रसिद्ध संगीतकार शंकर- जयकिशन यांच्या सदाबहार गाण्यांचे सुरेख सादरीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात झालेल्या एका सहज सुंदर कार्यक्रमात करण्यात आले. तुडुंब भरलेल्या सभागृहात सर्वच गाण्यांना उस्फूर्त दाद मिळाली. गाण्याचे चित्रपटातील स्थान, त्याची पार्श्वभूमी, शब्दांना देण्यात आलेले महत्त्व आणि गायकांची सुरेल जोड याचे विश्लेषण करणारा हा कार्यक्रम रसिकांना चांगलाच भावला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा तुडुंब भरलेले प्रेक्षागृह आणि मनमुराद आनंद घेणारे श्रोते असे दृश्य बघायला मिळाले.
सर्वांचे लाडके संगीतकार शंकर- जयकिशन यांच्या संगीतावर आधारित “ताक धिना धीन” हा दृकश्राव्य कार्यक्रम “बीयाँड एंटरटेनमेंट” ( Beyond Entertainment )यांच्या तर्फे सादर केला गेला.
प्रसिद्ध सिने लेखिका, व्यासंगी सिने पत्रकार सुलभा तेरणीकर आणि वंदना कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम सादर केला. उस्मान शेख यांनी व्हिडिओ संकलन केले. १९४९ च्या बरसात च्या संगीता पासून सुरू झालेला शंकर जयकिशन या जोडीचा हा सुरेल प्रवास, त्यांनी दिलेल्या अनेक लोकप्रिय गाण्यातून उलगडला गेला. बरसात, आवरा, श्री ४२० अशा राज कपूर यांच्या चित्रपटांबरोबरच,
पटरानी, छोटी बहन, सीमा, यहुदी, दिल तेरा दिवाना, आम्रपाली, अशा विविध गाण्यांचा खजिना प्रेक्षकांना तृप्त करून गेला. दोघींचे अतिशय सहज सुंदर आणि अभ्यासू निवेदन ही या कार्यक्रमाची मोठी जमेची बाजू होती. अडीच तास रंगलेल्या या कार्यक्रमानंतर याचे आणखी किमान दोन ते तीन भाग करण्याची मागणी एकमुखाने केली गेली. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देत कार्यक्रमाची सांगता झाली..