Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने शुक्रवारी (Election Commission Of India) हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची (Himachal Pradesh Election) घोषणा करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक एकाच टप्यात होणार आहे. याच वर्षी गुजरामध्येही (Gujarat) निवडणुका होणार आहेत, मात्र तिथल्या तारखा अद्याप निवडणूक आयोगानं जाहीर केल्या नाहीत. त्यामुळं निवडणूक आयोगावरही काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणूक आयोगानं देखील नियमांचं उल्लंघन केलं असल्याचं म्हटलं जात आहे.
2017 मध्ये नोव्हेंबरमध्ये दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि डिसेंबरमध्ये एकाच वेळी निकालही जाहीर करण्यात आला होता. मात्र, गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले होते. त्यामुळं निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन केलं नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Chief Election Commissioner Rajeev Kumar) यांनी सांगितले. दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या कालावधीत 40 दिवसांचा फरक असल्याचे राजीव कुमार म्हणाले. तो कालावधी किमान 30 दिवसांचा असावा जेणेकरून एकाच्या निकालाचा दुसऱ्यावर परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हिमाचल प्रदेश हा डोंगराळ प्रदेश आहे. त्यामुळे बर्फवृष्टीपूर्वी राज्यात निवडणुका व्हाव्यात, अशी निवडणूक आयोगाची इच्छा आहे. त्यामुळं आयोगानं नियमांचे उल्लंघन केलं नसल्याचे राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.