मुंबई: महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारचे घेतलेले काही निर्णय बदलण्यात आले. त्यातच मुंबईतील मंत्रालयातील प्रवेशद्वारावर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा लावलेला फलक एकाएकी हटविण्यात आला होता.
संत गाडगेबाबा (Saint Gadgebaba) यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वच्छता, समाजप्रबोधन आणि समाजकार्यासाठी समर्पित केले. संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा लावलेला फलक हटविल्याची बातमी समजताच संत गाडगेबाबा मिशन मुंबईच्या अध्यक्षा तथा काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी या कृतीविरोधात आवाज उठवला. संत गाडगे महाराज (Saint Gadgebaba) यांच्या कर्मभूमी अमरावती जिल्ह्याचे त्या प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांनी त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पत्र लिहित आपल्या संतप्त भावना कळवल्या. तसेच पूर्वीप्रमाणेच तो फलक लावण्याचा आग्रह केला होता. सोबतच समाजमाध्यमातून हा विषय लावून धरला होता.
अखेर माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’च्या फलकाचा मुद्दा लावून धरल्यानं शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली. संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’चा फलक येत्या दोन दिवसात नव्याने लागेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना करावी लागली. त्यानंतर मंत्रालयात दशसूत्रीचा फलक त्याच जागी पुनर्स्थापित करण्यात आला. त्यामुळे जनतेच्या प्रातिनिधिक वास्तूत पुन्हा एकदा जनतेचे संत गाडगेबाबांचा विचार तेवत राहील.