पुणे : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitaraman) पुणे (Pune) आणि बारामती (Baramati) दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा असल्याचा चर्चा आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात ‘व्यवस्था परिवर्तनाची वीस वर्षे’ या विषयावर त्यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी मराठीतून भाषण सुरु करत पुणेकारांना आश्चर्याचा धक्का दिला. सगळ्या पुणेकर बंधू भगिनींना माझा नमस्कार, तुम्ही सगळे कसे आहात?, असं म्हणत निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. भाषणादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात कशाप्रकारे परिवर्तन केलं, याबाबत त्यांनी भाष्य केलं.
निर्मला सीतारामण बारामतीचा दौरा देखील करणार आहेत. बारामती, पुरंदर आणि शिरुर या भागातील लोकांसमोर त्या आपले विचार मांडणार आहेत. मात्र त्यांची भाषा जनतेला सहजपणे समजेल, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच लगावला होता. मात्र, पुण्यात बोलताना निर्मला सीतारमण यांनी थेट मराठीतून भाषण सुरु करत सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.
देशातील जनतेचा विकासावर विश्वास आहे त्याचबरोबर मोदींवरही त्यांचा विश्वास आहे, असंही त्या बोलताना म्हणाल्या. पंतप्रधान मोदींनी भारताला वेगळ्या उंचीवर नेले आहे. भारत भ्रष्टाचारमुक्त करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. काही वर्षांपूर्वी डिजीटल इंडियाचं धोरण आखलं होतं तेव्हा अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र योग्य नियोजन करुन त्यांनी डिजीटल इंडियाचं धोरण पूर्ण केलं. त्यांच्यामुळे आता सगळं एका क्लिकवर उपलब्ध आहे, असंही म्हणत त्यांनी पंतप्रधानांचं भरभरून कौतुक केलं.