मुंबई : महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः शिवसेनेच्या गोटात मोठे बदल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना राज्यांच्या विविध भागातून बसणारे धक्के ताजे असतांनाच आता त्यांना राज्याबाहेरूनही हादरे मिळत आहेत. दहा राज्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईत मंगळवारी बैठक झाली. यावेळी दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह आठ राज्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत महाराष्ट्रात शिवसेनेला खिंडार पाडले. ४० आमदार, १२ खासदार, अनेक नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक शिंदेंच्या पाठीशी आले. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena) लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्याच्या विविध भागातून शिंदे गटात प्रवेश सुरुच आहेत. आता देशाच्या विविध भागांतूनही उद्धव ठाकरेंना (Shivsena Chief Uddhav Thackeray) धक्का बसत आहे.