मुंबई : प्रबोधनकार ठाकरे (Prabhodhankar Thackeray) यांचा जन्मदिवस संभाजी ब्रिगेडकडून (Sambhaji Brigade) अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
१७ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर “लोक प्रबोधन दिन” (Lok Prabhodan Din) म्हणून यावर्षीपासून साजरा करण्यात येणार आहे, असं संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे (Manoj Akhare) यांनी जाहीर केलं आहे.
आखरे यावेळेस म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे यांनी १६ ऑक्टोंबर १९२१ रोजी ‘प्रबोधन’ या पाक्षीकाचे प्रकाशन सुरू केले. त्यातुन त्यांनी आपल्या प्रखर सत्यवादी लेखणीतून महाराष्ट्राची वैचारीक मशागत केली. त्यांना प्रबोधनकार म्हणुन ओळख प्राप्त झाली. विषमतेच्या विरोधात सत्यशोधक बाण्याने निर्भिडपणे लोकांच्या बाजुने उभे राहणारे केशव सिताराम ठाकरे हे खरे प्रबोधनकार होते.
त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने क्रांतिविचांराचा जागर व्हावा म्हणुन प्रबोधनकारांचा जन्मदिवस महाराष्ट्रभर लोकप्रबोधन दिन म्हणुन भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.
प्रबोधनकारांनी धार्मिक अंधश्रध्दा, अनिष्ट रूढी-परंपरा पुरोहितशाही भांडवलशाही या विरूध्द आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण, प्रबोधन, शेतकरी, कामगार इत्यादी प्रश्नांसाठी आंदोलने केली.
प्रबोधनकारांनी सत्यशोधक परंपरा चालवत मांडलेला विचार व संघर्ष अजून संपलेला नाही. शेतकरी, बेरोजगार, युवक-युवती, कामगार, आदिवासी, शोषित यांचे प्रश्न कायम आहेत. वर्तमानात लोकशाहीच्या नावावर हुकुमशाही लादल्या जात आहे. म्हणुन भारताचे संविधान व लोकशाही अबाधित राहण्यासाठी लोकप्रबोधनाची अत्यंत गरज आहे. म्हणुन १७ सप्टेंबर हा प्रबोधनकारांचा जन्मदिवस हा लोकप्रबोधन दिन म्हणुन सर्वत्र उत्साहाने आयोजित केला जाणार आहे, अशी भूमिका आख्रे यांनी यावेळेस स्पष्ट केली.