कोरोनाच्या लसी संदर्भात मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांना हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. (CEO of Serum Institute Adar Poonawalla and Bill Gates received notice from High Court) कोरोना लसीबाबत दाखल झालेल्या याचिकेवरून हायकोर्टाने ही नोटीस पाठवली आहे. कोरोना लसीच्या दुष्परिणामामुळे डॉ. स्नेहल लुनावत यांचा मृत्यु झाल्याचा आरोप त्यांचे वडील दिलीप लुनावत यांनी केला आहे. त्यांनी एक हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
डॉ. स्नेहल लूनावत (Dr. Snehal Lunavat) नाशिकमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. त्यांनी कोविशिल्ड ही लस घेतल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि अखेर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. स्नेहल यांनी 28 जानेवारी 202 ला कोविशिल्ड लस घेतली. आणि त्यानंतर 1 मार्च रोजी त्यांचे निधन झाले असल्याचे दिलीप लुनावत यांनी म्हटलं आहे. आपल्या मुलीचा मृत्यू केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटच्या चुकीमुळे झाला, असा आरोप करत डॉ. स्नेहल लुनावत यांचे वडील दिलीप लूनावत यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
ड्रग्स कंट्रोलर ऑफ इंडिया (DCGI) आणि एम्स यांनी लसीच्या दुष्परिणाम होत नसल्याचे सांगत चुकीची माहिती दिली. राज्य सरकारने देखील कोणतीही चाचणी न करता लस उपलब्ध केली. आपल्या दिवंगत मुलीला न्याय देण्यासाठी याचिका दाखल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.