यंदा गणेशोत्सवाच्या (Ganpati Festival) निमित्ताने महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने (Maharashtra Govt) एका विशेष उपक्रमाची सुरुवात केली आहे. यंदा मुंबईमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या देशातील महावणिज्य दूत यांना पर्यटन विभागाच्या वतीने मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन करवण्यात येणार आहे. यासाठी पर्यटन विभागाकडून 2 आणि 7 सप्टेंबर या तारखांची निवड करण्यात आलेली आहे.
एमटीडीसीच्या (MTDC) वतीने लालबागच्या राजाचं यासोबतच गिरगावच्या राजाचं आणि माटुंगाच्या जीएसबी गणपतीचं या सर्व कॉन्सिलेट जनरल यांना दर्शन करवण्यात येणार आहे. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा स्वतः लालबागच्या राजाचं दर्शन घेताना या सर्व शिष्टमंडळासोबत उपस्थित राहणार आहेत. याबाबत माहिती देताना एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय महासंचालक जयश्री भोज म्हणाल्या की, या उपक्रमाचं हे पहिलं वर्ष आहे. या उपक्रमामुळे नक्कीच परदेशातील नागरिकांपर्यंत गणेशोत्सवाबाबत माहिती पोहोचेल आणि या उपक्रमाला पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असंही भोज यांनी सांगितलं आहे.