मुंबई :
“अध्यक्ष महोदय तुम्ही विद्यार्थ्याला (आदित्य ठाकरे) नीट मार्गदर्शन केलेलं नाही, अन्यथा ही वेळ आली नसती, शिवाजी पार्कात उभा राहून मी मर्द आहे हे बोलणं सोपं असतं”, अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना भर सभागृहातच डिवचले. (MLA Nitesh Rane criticized Aditya Thackeray) आदित्य ठाकरे हे कायद्याचं शिक्षण घेत असताना विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. हाच संदर्भ लक्षात घेऊन नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंचा चिमटा काढला. नितेश राणे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही आदित्य ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला. “काही लोक म्हणतात बेकायदेशीर सरकार स्थापन झालंय, पण हेच लोक रोज सकाळी उठून कोर्टात जायचे. तरीही आमचा मार्ग मोकळा झाला, सगळा खेळ आकड्यांचा असतो आणि आमच्याकडे नंबर्स आहेत”, असं उत्तर त्यांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) दिलं.
दुपारी सभागृहात भाजप आमदार नितेश राणे यांनी बेसावध असलेल्या आदित्य ठाकरे यांना डिवचलं. “अध्यक्ष महोदय तुमच्या विद्यार्थ्याचं लक्ष नव्हतं… तुम्ही विद्यार्थ्याला मार्गदर्शन करत असताना त्यांचं नीट लक्ष नव्हतं, अन्यथा ही वेळ आली नसती, शिवाजी पार्कात उभा राहून मी मर्द आहे हे बोलणं सोपं असतं…” असं म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंनी डिवचलं. मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु असताना ही खडाजंगी झाली.