नागपूर :
दहीहंडीच्या उत्सवात यंदा (Maharashtra Politics) राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या उत्सवात विविध राजकीय पक्षानी स्वत:ची रणनिती आणि पुढील धोरणे काय आहेत हे स्पष्टच केले आहे. आगामी काळात राज्यात काही ठिकाणी (Municipal Election) महापालिका निवडणुका होत आहेत. त्यामुळे भाजपाने केवळ मुंबईवरच लक्ष केंद्रीत केले असे नाहीतर विदर्भातील अनेक जागांवरही भाजपची नजर आहे. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाल्यापासून सबंध राज्यात भाजपाचे कमळ फुलणार असा दावा केला जात आहे. त्यानुसारच त्यांनी बुलढाणा आणि अमरावतीमध्ये केलेल्या विधानाने शिंदे गटाची डोकेदुखी वाढत आहे. त्यांनी अमरावती आणि भाजप या दोन्ही ठिकाणी भाजपचाच खासदार असणार असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजपाच्या गटात उत्साह संचारला आहे. मात्र, शिंदे गटाचे काय होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव आहेत जे शिवसेनेतून शिंदे गटात आले आहेत. त्यामुळे भविष्यात शिंदे गट आणि भाजपा हे एकत्र लढले तरी जागांचा विषय कसा मिटणार हे पहावे लागणार आहे.
भाजपाच्या प्रदेशाध्यपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागल्यापासून ते संपूर्ण महाराष्ट्रात कमळ फुलवण्याचे स्वप्न बाळगून आहेत. राज्यात केवळ महापालिकाच नव्हेतर आगामी लोकसभा आणि विधानसभेतही भाजपाचाच डंका असणार असा विश्वास व्यक्त करत आहेत. मग आगामी काळात भाजपा आणि शिंदे गट खरोखरच एकत्र लढणार की नाही? लढले तर नेमक्या शिंदे गटाला जागा किती? शिवाय ज्या मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार निवडुन आला त्या सर्व जागा शिंदे गटाला सोडल्या जाणार की नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण ज्या बुलढाणा लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे खासदार हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत तिथे देखील आगामी खासदार हा भाजपचाच असणार असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे प्रतापराव जाधवांचे काय होणार? असा प्रश्न आहे.
प्रदेशाध्यपदी वर्णी लागल्यापासून चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यभर विविध भागात दौरे करत आहेत. सोमवारी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने ते अमरावती आणि बुलढाणा येथे दाखल झाले होते. या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करायचे असतील तर अमरावती आणि बुलढाणा या मतदार संघात खासदार, आमदारही भाजपचेच असतील हे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे या मतदार संघात शिंदे गटाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.