TOD Marathi

मुंबई :

तब्बल चाळीस दिवसानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार (Cabinet Expansion) पार पडला. यात 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र या नव्या अठरा मंत्र्यांमध्ये कुठेही भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं नाव आलं नाही. त्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं. या रक्षाबंधनानंतर त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे जाहीर केली. “वरीष्ठ नेत्यांना माझी पात्रता वाटत नसेल म्हणून मला मंत्रीपद दिलं नसेल” असा टोला त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातलं राजकारण तापण्याची शक्यता आहे. तसेच पंकजा मुंडे यांचे कार्यकर्तेही आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे.

 

याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ज्यावेळेस मंत्रिमंडळ बनत असतं त्यावेळेस सर्वांना समाधानी करणं शक्य नसतं. त्यामुळे जे मंत्री झाले त्यांनी तरी लोकांचा समाधान करावं अशा शुभेच्छा माझ्या नव्या मंत्र्यांना देऊन झालेल्या आहेत. तसेच मी चर्चेत राहणारच नाव आहे, मात्र अजून त्यांना माझी पात्रता वाटत नसेल, त्यामुळे मला मंत्रीपद दिलं नसेल, जेव्हा त्यांना माझी पात्रता वाटेल तेव्हा देतीलही कदाचित, त्याबद्दल मला काही आक्षेप नाही, या चर्चा मीडियातून होतात, कार्यकर्त्यातून होतात अशी प्रतिक्रिया यावेळी पंकजा मुंडे यांनी दिलेली आहे.

नव्या मंत्रिमंडळात महिला या असल्याच पाहिजेत, महिला म्हणजे महिला बालकल्याण, एखादा मुस्लिम बांधव म्हणजे, अल्पसंख्यांक, आदिवासी भागातून म्हटल्यावर आदिवासी विकास, शेड्युल कास्ट म्हणजे शेड्युल कास्ट खातं असं करू नये, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तसेच मला कौतुक वाटतं की मागच्या मंत्रिमंडळात मी महिला असूनही मला ग्रामविकास खातं मिळालं होतं. अशा रितीनेच महिलांना संधी दिली पाहिजे, अशी अपेक्षा मी या मंत्रिमंडळाकडून व्यक्त करते, असेही त्या पुढे म्हणाल्या आहेत.

गेल्या विधानसभेला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरुद्ध परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची कुठेतरी वर्णे लावण्यात येईल, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र गेल्या अडीच तीन वर्षात पंकजा मुंडे यांना सतत भाजपच्या नेतृत्वाकडून डावलण्यात आलं आहे. अलीकडे राज्यसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळी राज्यसभेवर पंकजा मुंडे यांना पाठवतात की काय अशा चर्चा सुरू होत्या. मात्र राज्यसभेवरतीही त्यांची निवड झाली नाही. त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या, तिथेही पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार अशा चर्चा सुरू झाल्या मात्र या चर्चाही तेवढ्याच वेगाने दबल्या.