रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात (Konkan, Ratnagiri, Raigad) पुढील ४८ तासांसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर त्यापुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट (Orange Alert) असणार आहे. नागरिकांनी या काळात खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे, दोन्ही जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यात रत्नागिरीच्या तुलनेत पाऊस कमी आहे. मात्र, पुढील ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दोन दिवस सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात काही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाशिष्ठी आणि जगबुडीने गेल्यावर्षी महापुराने थैमान घातले होते. सद्यस्थितीत सुरू असणाऱ्या पावसामुळे उद्या होणारा नियोजित हेरिटेज वॉक बुधवारी १० ऑगस्ट रोजी होणार आहे. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी अशी सूचनाही रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने केली आहे.
जिल्हयात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. शनिवारी पावसाने जोर धरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने पाऊस कमी झाला आहे. गेले १५ दिवस पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होता. पावसाने ओढ दिल्याने पाण्याचा पंप लावून शेतीला पाणी लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र, आता झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.