केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेस आज देशभर रस्त्यावर उतरली आहे. मुंबईत काँग्रेस कार्यकर्ते राजभवनाला आज घेराव घालणार आहेत. वाढती महागाई तसेच जीवनावश्यक वस्तूंवर लावण्यात आलेला जीएसटी यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं आहे, देशात बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि या परिस्थितीला केंद्र सरकारची चुकीची धोरणं जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वतीने नोटीसी पाठवण्यात आलेले आहेत.
मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी राजभवनाकडे निघाले होते मात्र या सर्व नेते मंडळींना विधान भवन परिसरात पोलिसांनी अडवलं. त्यामुळे ही अघोषित आणीबाणी आहे, देशात हुकूमशाही सुरू आहे असे प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole Congress) यांनी व्यक्त केले.
राज्यामध्ये ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना मदत तर दूरच, साधे पंचनामे देखील करण्यात आले नाहीत. मुख्यमंत्री कुठे आहेत उपमुख्यमंत्री कुठे आहेत राज्य शासन दिल्लीतून चालतय, असा घणाघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat Congress) यांनी केला.