मुंबई : गेल्या पंधरा वर्षांपासून फुले-शाहु-आंबेडकरी विचार सगळीकडे पोहोचवणाऱ्या वक्त्या आणि मागील काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देणाऱ्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आज शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Shivsena) यांच्या उपस्थितीत आज दुपारी मातोश्रीवर त्या भगवा ध्वज हाती घेणार आहेत. सुषमा अंधारे यांच्या रुपाने शिवसेनेला सभा गाजवणाऱ्या आक्रमक नेत्या मिळाल्या आहेत. ठाकरे कुटुंब कठीण परिस्थितीत असताना एक बहीण म्हणून आपण त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.
सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत ठाकरे कुटुंबियांचा साधेपणा सुषमा अंधारे यांना कमालीचा भावला होता. त्याचवेळी त्यांच्या मनात शिवसेनेबद्दल मोठा सॉफ्ट कॉर्नर तयार झाला. यापूर्वी सुषमा अंधारे यांना उजव्या विचारसरणीवर तसेच कट्टर पंथीयांवर हल्लाबोल करणाऱ्या नेत्या म्हणून ओळखलं गेलं. त्या आपल्या जाहीर भाषणांमधून आरएसएस, बजरंग दल यांसारख्या उजव्या विचारसणीच्या संघटनांवर जोरदार प्रहार करायच्या. तसेच अनेकदा त्यांनी शिवसेनेवर देखील सडकून टीका केली आहे. पण सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अनेक जुने सहकारी साथ सोडत असताना त्यांच्यासारख्या संयमी नेतृत्वाला साथ द्यायला हवी अशा विचाराने मी शिवसेनेत प्रवेश करतेय, शिवसेना पक्षप्रवेशामागे मला काहीतरी मिळेल, अशी माझी अपेक्षा नाही, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
मागील अडीच वर्षांपासून सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं (NCP) काम करत होत्या. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी आपल्या भाषणांनी सभा गाजवल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना सुषमा अंधारे यांना विधान परिषद मिळेल, असं वाटत असताना पक्षाने त्यांच्याऐवजी आक्रमक चेहरा म्हणून अमोल मिटकरी यांची वर्णी लावली. तेव्हापासून त्या नाराज असल्याची चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या माध्यमातून त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं असुन आज दुपारी त्या अधिकृतरित्या शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेणार आहेत.