मी फिक्स मॅच पाहत नाही, मी नेहमी लाईव्ह मॅच पाहतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. शिवसेनेतील बंड आणि राज्यातील उलथापालथ या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘सामना’ वृत्तपत्रामध्ये मंगळवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बहुचर्चित मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. याच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यांनी या मुलाखतीत एकनाथ शिंदे गट आणि भाजपलाही चांगलंच लक्ष्य केले होते.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रसारमाध्यमांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता फडणवीसांना उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये भाजपवर केलेल्या टीकेसंदर्भात विचारलं असता त्यावर फडणवीस यांनी म्हटले की, मी फिक्स मॅच पाहत नाही. मी लाईव्ह मॅच पाहतो, खरी मॅच पाहतो. फिक्स मॅचबद्दल काय बोलायचं, मी त्यावर काय प्रतिक्रिया देणार? असं म्हणत, काही दिवसांनी वेळ आल्यावर मी यासंदर्भात बोलेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात असणाऱ्या संभाजी महाराजांच्या समाधीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेला दावा खोडून काढला. संभाजी महाराजांच्या समाधीच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता. परंतु, अजितदादा यांच्यासारख्या नेत्याने तरी असा आरोप करण्यापूर्वी थोडी माहिती घ्यायला पाहिजे होती. संभाजी महाराजांच्या समाधी बांधण्याच्या कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही. उलट मी त्यासंदर्भातील फाईलवर शेरा लिहला आहे की, संभाजी महाराजांच्या समाधीच्या कामाला स्थगिती देणे योग्य होणार नाही. या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री आणि माझ्यासमोर सादरीकरण करावे. जेणेकरून याबाबत आणखी काही कामे करावयाची असल्यास तसे सांगता येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांना नव्या सरकारने आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना स्थगिती दिली आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा देवेंद्र यांनी हा आरोप फेटाळून लावला. आदित्य ठाकरे नव्हे तर सर्वच मंत्र्यांच्या विभागातील निर्णयांची तपासणी केली जात आहे. महाविकास आघाडी सरकार पडले तेव्हा जाता जाता त्यांनी ४०० अधिसूचना (जीआर) काढले. ते काढायला नव्हते पाहिजे. सरकारच्या तिजोरीत असलेल्या पैशांपेक्षा पाचपट पैसे वाटण्यात आले. त्यामुळे हे प्रकल्प असेच पुढे सुरु ठेवले तर सरकारचे दिवाळे निघेल. यामुळे सरकारी तिजोरीवर भर पडेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.