पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसद भवनाच्या छतावरील राष्ट्रीय बोधचिन्हाचे म्हणजेच अशोक स्तंभाचं अनावरण नुकतंच करण्यात आलंय. (PM Narendra Modi launched National Emblem) 9500 किलो ग्रॅम वजनाचा असलेल्या या स्तंभाची उंची 6.5 मीटर असून तो कांस्य या धातूपासून बनवण्यात आलाय. मोदींनी या अशोक स्तंभाची पूजा केली खरी. पण विरोधकांनी मात्र यावरून मोदींना चांगलच टार्गेट केलंय. कोणत्याही धार्मिक गोष्टीचं संसदेत उद्दतिकरण केलं जाऊ नये, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र सम्राट अशोकानं बनवलेलं हे चक्र इतकं महत्त्वाचं का आहे? त्याचा अर्थ नक्की काय? आणि या अशोक चक्राच हिंदू धर्माशी खरंच काही कनेक्शन आहे का? हेच आपण समजून घेऊया…
भारतानं 26 जानेवारी 1950 ला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच अशोक स्तंभ देशाचं राष्ट्रीय बोधचिन्ह म्हणून स्वीकारलं. पण या चिन्हाचा इतिहास हा काही शेकडो वर्ष जुना आहे. मौर्य वंशाचा तिसरा शासक म्हणजे सम्राट अशोक. अशोकाचं साम्राज्य आशियात सर्वदूर पसरलं होतं. पण सम्राट अशोक हा अत्यंत क्रूर आणि तितकाच निर्दयी राजा म्हणून ओळखला जायचा. मात्र त्याच्या कारकिर्दीतील कलिंगच्या युद्धात झालेल्या रक्तपातनंतर त्याला भरपूर दुःख झालं. आणि अखेर त्यानं बौद्ध धर्माचा स्वीकार करत शांतीचा मार्ग पत्करला.
त्यानं आपलं यांनतर संपूर्ण आयुष्य बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी वाहिलं. आपल्या राज्याच्या शासन, संस्कृती आणि शांतीच प्रतीक म्हणून त्यानं याच काळात तब्बल 84 हजार स्तुप आणि स्तंभाची निर्मिती केल्याचं बोललं जातं. यातलाच एक स्तुप हा सारनाथचा लोकप्रिय अशोक स्तंभ.
गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपलं पहिलं धर्म प्रवचन दिलं अगदी त्याच ठिकाणी सम्राट अशोकानं हा स्तंभ उभारला. या अशोक स्तंभाच्या शीर्ष भागावर चार सिंह हे मौर्यशैलीत कोरलेले असून त्याच्या अगदी खालोखाल हत्ती, घोडा, बैल, आणि चोवीस आर असलेलं एक चक्रही कोरण्यात आलंय. हे चक्र बुद्धांच्या धर्मचक्राचं प्रतीक असून चार सिंहाची चतूर्मुख प्रतिमा शक्ती, धाडस, आत्मविश्वास आणि गौरवतेच प्रतीक म्हणून ओळखलं जातं. नीट निरखून पाहिलं तर हा वरचा भाग खुललेल्या कमळाच्या पानावर उभा आहे. या कमळाची पान खालच्या बाजूस झुकलेली आहेत. त्याला विनम्रतेचं प्रतीक म्हणूनही ओळखलं जातं. स्तंभावरील घोडा हे प्रामाणिकता आणि आयुष्यातील वेग दाखवतो.
पाली भाषेत बुद्धाला पर्यायवाची शब्द हा सिंह असल्यानं बुद्ध धर्माचा प्रसार चारी दिशांना होत असल्याचं दाखवण्यासाठी ही चतूर्मुख प्रतिमा असल्याचं काही इतिहासकार मानतात.
हा स्तंभ सातव्या शतकाच्या आसपास उध्वस्त करण्यात आला. मात्र याचा सिंह चतूर्मुखी भाग सारनाथ इथल्याच म्युझियम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आलाय.
‘सत्यमेव जयते’ या अर्थानं 1950 मध्ये अशोक चिन्ह भारताचं बोधचिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलं. याचा अर्थ होतो नेहमी सत्याचा विजय होतो. हिंदु वेदातील एक भाग असलेल्या मुंडक उपनिषद पासून हे नाव घेण्यात आलंय.