महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारला (Mahavikas Aghadi Government) अडीच वर्षाचा कालखंड मिळाला, या सरकारने अनेक चांगले व लोक हीताचे निर्णय घेतल्याने महाराष्ट्रात अनेक प्रकल्प मार्गी लागले मात्र गेल्या अडीच वर्षात सांस्कृतिक खातं मात्र निष्क्रिय होत. कारण या खात्याला मिळालेल्या अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्यासारख्या अरसिक व अकार्यक्षम मंत्र्यामुळे कलावंतांचे खूप मोठे नुकसान झाले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक आणि चित्रपट सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यामार्फत लोक कलावंताचा प्रश्न असो किंवा मराठी चित्रपटला उद्योगाचा दर्जा देण्यासाठीची धडपड असो किंवा वृद्ध कलावंतांचे मानधन वाढवून देण्याची प्रक्रिया असो, यांसह मुंबईमध्ये कलाकार भवन उभे करावे, लोक कलावंतांसाठी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, यासाठीचा सतत पाठपुरावा आपण केला, यासाठी अजितदादा आणि सुप्रियाताईंनी देखील सतत अमित देशमुख यांना भेटून विविध निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन केले तरीही माजी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी कुठलेही कलावंतहिताचे निर्णय न घेतल्यामुळे गेल्या अडीच वर्षात अनेक कलावंतांना विविध उपयोजनांपासून वंचित राहावे लागले. करोना काळामध्ये 56 हजार कलाकारांना त्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन देखील फेल गेले. (Promises for artists failed by Cultural ministry)
वृद्ध कलावंतांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव तसेच मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा दर्जा देण्याच्या संदर्भात निर्णय अजित पवार यांनी तत्काळ मार्गी पण लावला होता. मात्र अमित देशमुख यांच्या कार्यालयाकडे कलावंताच्या मानधन वाढीचा प्रस्ताव, मराठी चित्रपटाला उद्योगाचा दर्जा देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव पडून राहिल्यामुळे शेवटी सरकार गेल तरीही त्यावर निर्णय झालेला नाही. यातील वरील सर्व मागण्या आणि त्यांचा सतत पाठपुरावा मी केला मात्र पाठपुरावा करून देखील त्यांनी अडीच वर्षात एकदाही हे विषय मंत्रिमंडळाच्या मीटिंग मध्ये घेतले नाही, अडीच वर्षात अधिवेशन झालीत त्यामध्ये घेतले नाही, या संदर्भात चर्चा देखील केली नाही, म्हणून माजी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच कलाकारांचे मोठे नुकसान झाले असे खेदजनक आम्हाला बोलावं लागतं असेही बाबासाहेब पाटील म्हणाले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख (Former CM Vilasrao Deshmukh) साहेब यांच्या कार्यशैलीमध्ये आणि अमित देशमुख यांच्या कार्य शैलीमध्ये जमीन आसमानाचा फरक दिसून येतो, अनेक जुने मोठे कलाकार स्व. विलासराव देशमुख यांच्या अनेक वेळा संस्कृतिक कामाबद्दल कामाच्या पावत्या व स्तुती करताना दिसले, त्याच बरोबर उलट अमित देशमुख यांना अगदी मोठ्या प्रमाणावर नाव ठेवताना महाराष्ट्रातील कलाकार दिसले, त्यामुळे आतातरी शिंदे सरकार सांस्कृतिक विभागाला रसिक व सांस्कृतिक जाण असलेले मंत्री देतील अशी अपेक्षा बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.