TOD Marathi

नुकताच महेश मांजरेकर यांचा ‘दे धक्का’ 2 (De Dhakka 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात महेश मांजरेकर यांनी मराठी प्रेक्षकांविषयी नाराजी व्यक्त करतानाच मराठी प्रेक्षक आहे कुठे? असा सवाल उपस्थित केलाय. त्यांच्या या टीकेवर नेटकरांनी चांगलाच समाचार घेतलाय. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सुद्धा मराठी प्रेक्षकांविषयी भाष्य करणाऱ्या महेश मांजरेकर यांना दर्जेदार चित्रपट आहे तरी कुठं? असा प्रति प्रश्न केला आहे. (Babasaheb Patil Reacted Over Mahesh Manjrekar’s Comment)

बाबासाहेब पाटील पुढे असं म्हणाले की या मराठी इंडस्ट्रीने अनेक वर्ष मराठी प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवलं आहे. दादा कोंडके यांचा सिनेमा असो की अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले असे अनेक दर्जेदार नट यांनी रौप्यमहोत्सवापासून तर सुवर्णकमळापर्यंतचा आपला प्रवेश गाठला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासुन दर्जेदार सिनेमाची निर्मितीच होत नसल्यामुळे प्रेक्षक सिनेमागुहांपर्यंत जात नसल्याची एक मोठी खंत आहे. त्यातही महेश मांजरेकरांचाच नटसम्राट, लालबाग परळ, काकस्पर्श, अस्तित्व, तसेच सुबोध यांचा कट्यार काळजात घुसली, श्वास, रवी जाधव यांचा कच्चा लिंबू, न्यूड, शाळा, नागराज मंजुळे यांचा सैराट, फँड्री असे अनेक दर्जेदार सिनेमे सुद्धा लोकांनी अनुभवले आहेत, हे सगळे सिनेमे दर्जेदार होती म्हणूनच प्रेक्षक सिनेमागृहापर्यंत पोहोचले असं मत पाटील यांनी व्यक्त केलं. मात्र आता निर्मिती होणाऱ्या अनेक चित्रपटात एक तर बॉलीवूड किंवा साउथच्या सिनेमाला मिक्स करून सादर केलेला मराठी सिनेमा हा आजही मराठी प्रेक्षकांच्या पचणी पडत नाही. त्यामुळे बिना लॉजिक कुठलाही सिनेमा प्रेक्षक पाहायला जाणार नाही हीच खरी बाब निर्मात्यांच्या मनात घट्ट घर करून बसली पाहिजे. जेणेकरून दर्जेदार सिनेमाच्या नावावरती फालतू सिनेमे प्रेक्षकांपर्यंत सादर करता येत नाहीत, हे जरी समजलं तर मराठी प्रेक्षक किती चोखंदळ आहे हे वेगळं सांगण्याची गरज पडणार नाही.

महेश मांजरेकर यांच्यासारख्या निर्मात्याने प्रेक्षकांबद्दल केलेलं वक्तव्य निश्चितच अयोग्य सुद्धा नाही. मात्र मराठी चित्रपटाची निर्मिती शंभराच्यावर वर्षभरात होते त्यापैकी बोटावर मोजणे इतकेच सिनेमे चित्रपटगृहात सादर केली जातात त्यातल्या त्यात त्यापैकी काही सिनेमे इतकी बंडल असतात की त्या निर्मात्याची मनापासून कीव येते की त्यांनी मराठी सिनेमा करण्याचा इतका मोठा अट्टाहास केलाच का? आणि सिनेमात काही दम नसताना सुद्धा अनेकांना सिनेमा सुपरहिट व्हायलाच पाहिजे ही मुळात अपेक्षा करणं चुकीचं आहे आणि सिनेमा दर्जेदार ठरवणार हा अधिकार प्रेक्षकांचा आहे त्यामुळे ते प्रेक्षक जर चित्रपटगृहाकडे येत नसतील तर आपल्या सिनेमात काहीतरी कमतरता आहे, याचाही विचार होणं पण महत्त्वाच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या निर्मात्यांनी एकत्रित येऊन दर्जेदार सिनेमाची निर्मिती करून प्रेक्षकांपर्यंत एक चांगली कलाकृती कशी सादर करता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. हे समजून घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला आपल्या मराठी सिनेमाचा पूर्व इतिहास लक्षात घेतला पाहिजे. मराठी चित्रपट क्षेत्राला या सर्व कारणाने उतरती कळा लागली आहे, ज्या सिनेमांना लॉजिक नाही अशी सिनेमे सुद्धा काही निर्माते पैशाच्या कमतरतेमुळे किंवा सिनेमाचा कुठलाही अनुभव नसल्यामुळे अशी दर्जाहीन सिनेमे तयार करतात आणि त्यामुळे मराठी सिनेमाकडे प्रेक्षक जात नाहीत.

हाच विचार महेश मांजरेकर यांनी केला तर निश्चितच मराठी सिनेमाला (Marathi Cinema) हाउसफुलची पाटी लागायला वेळ लागणार नाही. प्रेक्षक कुठलाही असो जर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव त्याच्या विचाराचा प्रतिबिंब आणि त्यांनी लावलेल्या पैशाचा मानसिक समाधान जोपर्यंत होणार नाही तो पर्यंत प्रेक्षक येणारच नाही. जर महेश मांजरेकर साहेबांनी सध्या मराठी सिनेमांना मिळणारा चित्रपटगृहांत दुजाभाव, चित्रपट डिस्ट्रीब्यूशनमध्ये निर्मात्यांची होणारी फसवणूक या सगळ्या बाबींकडे जर लक्ष दिलं तरच खऱ्या अर्थाने निर्माता टिकेल आणि चांगल्या सिनेमाची निर्मिती होईल व महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहामध्ये सुंदर सिनेमे लागतील व तिथे सिनेमा बघायला प्रेक्षक सुद्धा येतील, अशी अपेक्षा व्यक्त केलीय. प्रेक्षकगृहात गेलेल्या प्रेक्षकांना समाधान मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही भाषेतला सिनेमा असो तो प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणणारच नाही. त्यामुळे माझी महेश मांजरेकर यांना नम्र विनंती आहे, की महाराष्ट्रातल्या निर्मात्यांना एकत्र करून दर्जेदार सिनेमाची निर्मिती कशी होईल व आताचे जे चित्रपटाची आणि चित्रपटगृहाची अवस्था आहे, त्याच्यातही काहीतरी चांगले बदल घडले पाहिजेत ही अपेक्षा बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे.