मुंबई | गेल्या ९ वर्षात भाजपला एनडीएची आठवण झाली नव्हती. परंतु आम्ही पाटणा आणि बंगळुरुला जमलो, तेव्हा मोदी-शाह-नड्डांना एनडीए आठवली. आम्ही एकत्र जमलेलो पाहून त्यांना भीती वाटते. विरोधकांच्या आघाडीला भ्रष्टाचारी म्हणता, मग काल तुमच्याशेजारी तर ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा उभा होता, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला, तर अजित पवार यांच्या एनडीए बैठकीतल्या उपस्थितीवरुन त्यांना टोला मारला.
महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटासह एनडीएतील ३८ पक्षांच्या नेत्यांचा सहभाग असलेली ही बैठक राजधानी नवी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये पार पडली. त्याचा समारोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी आघाडीवर घणाघाती प्रहार केले.
हेही वाचा ” …“यापुढे बरंच काही…”, किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर राऊतांचं सूचक ट्वीट”
राऊत पुढे म्हणाले “मोदी म्हणजे इंडिया नाही. भाजप म्हणजे इंडिया नाही. आमच्या गठबंधनचं नाव ‘INDIA’ आहे. यात कुणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही. ‘मोदी इज इंडिया’ हा भारताचा अपमान नाही का? असा सवाल उपस्थित करताना ‘भारतीय जनता पक्ष’ या नावात ‘भारत’ नाही काय?” असा उलट प्रश्न संजय राऊत यांनी आक्षेप घेणाऱ्यांना विचारला.
“मोदींच्या आजूबाजूला भ्रष्टाचाऱ्यांचं संघटन होतं. त्यांच्या बाजूला ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा उभा होता. त्यांच्या पाठीमागे ‘इक्बाल मिर्ची’ उभा होता. यांना बाजूला उभा करुन आमच्यावर कसले भ्रष्टाचाराचे आरोप करता? तुम्ही ही असली ढोंगं बंद करा, लोकांना तुमचं हे ढोंग कळतंय, त्यामुळे INDIA चा विजय होईल आणि भाजपचा पराभव होईल. हा इंडिया तुमच्या हुकूमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. हिम्मत असेल तर एनडीएने भारताचा पराभव करुन दाखवावा”, असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं.