मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या बंडखोर आमदारांकडून संजय राऊत यांना वारंवार लक्ष्य करण्यात आले होते. (Sanjay Raut were attacked by rebellion MLAs) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याभोवती असणाऱ्या चार डोक्यामुळे पक्षाचे वाटोळे झाले, असा बंडखोर आमदारांचा सूर आहे. या टीकेला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. या चार लोकांमुळेच कालपर्यंत तुम्हाला सत्ता मिळाली होती. हे चार लोक सतत पक्षाचेच काम करत होते. आजही हे चार लोक पक्षाचेच काम करत आहेत. गेली अडीच वर्षे तुम्ही सत्तेत होता. त्यापूर्वीही तुम्ही सरकारमध्ये होता. आज तुम्ही ज्या चार लोकांना बदनाम करत आहात, ते शिवसेनेचे निष्ठावंत आहेत, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. ते मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या निकटच्या सल्लागारांना कायम लक्ष्य केले होते. या सगळ्यांचा रोख संजय राऊत यांच्या दिशेने होता. याच मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी आता बंडखोरांना चांगलेच फटाकरले. उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नव्हेत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. उद्धव ठाकरे हे स्वत:चे निर्णय स्वत: घेतात. जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो. तुम्ही आता पक्षातून निघून गेले आहात, आता आपलं काम करा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी बंडखोरांना सुनावले.
यावेळी खासदार संजय राऊत यांनी शिवसेना येणाऱ्या काळात महाराष्ट्रात १०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणेल, असा दावाही केला. सध्याच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील लोकांच्या मनात जी चीड पाहायला मिळत आहे, ते पाहता आगामी काळात शिवसेनेचे १०० पेक्षा अधिक आमदार विजयी होतील. (We will win 100 seats in coming elections) आमदार सोडून गेले म्हणजे मतदार सोडून गेले, असा अर्थ होत नाही. एकनाथ शिंदे हे काल बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन नतमस्तक झाले असले तरी इतिहासात त्यांची नोंद वेगळ्या पद्धतीने होईल. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करण्याचा प्रयत्न केला, असेही संजय राऊत यांनी सांगितले.