TOD Marathi

मुंबईः शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawli) यांचे निवटवर्तीय सहकारी सईद खान यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मनी लॉण्ड्रिंगचे आरोप व त्यांच्याशी संबंधित संस्थांतील घोटाळ्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं (ED) सईद खान (Saeed Khan) याला अटक केली होती. उच्च न्यायालयाने एक जुलै रोजी खान यांचा जामीन मंजुर केला आहे.

खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीनं गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ व वाशिम येथील पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले होते. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने येथून अनेक कागदपत्रेही जप्त केली होती. भावना गवळीशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही यात चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणात सप्टेंबरमध्ये सईद खान यांना अटक करण्यात आली होती. (Saeed Khan was arrested in this case) या अटकेविरोधात खान यांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, याआधी कोर्टाने खान यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

ईडी विशेष न्यायालयाने खान यांचा याआधी जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी अटकेविराधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीने मे २०२०मध्ये फसवणूक प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. सईद खान यांची पावणेचार कोटींची मालमत्ताही ईडीने जप्त केली आहे. कोर्टाने सईद खान यांना एक लाख रुपयांच्या जात मुचकल्यांसह आणि अटींसह जामीन मंजूर केला आहे.

कोण आहेत सईद खान ?

परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील रहिवासी असलेला सईद खान हा मोठा कंत्राटदार आहे. तो गवळी यांचे निकटवर्तीय मानला जातो. कंत्राटदार असल्यानं कामाच्या निमित्तानं सईद हा भावना गवळी यांच्या संपर्कात आला. खान याच्या माध्यमातून भावना गवळी यांनी आजवर अनेक मोठमोठी कामं केली असल्याचं बोललं जातं.