TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 2 जुलै 2021 –  आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मोटारीवर अज्ञाताने दगडफेक करून काच फोडली. त्यामुळे राज्यातील राजकारण तापले आणि भाजप – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान सुरू झाले. यावरून उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पडळकरांच्या तोडफोड प्रकरणावर भाष्य करत गोपीचंद पडळकर यांच्या मोटारीवर दगड राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी मारला हे कशावरून? असा सवाल उपस्थित केला आहे.

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली होती.

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते. अजित पवारांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी अजित पवार म्हणाले, गोपीचंद पडळकरांना आम्हीच विरोधक आहोत. म्हणून ते आमच्यावरच आरोप करणार आहे. त्यांच्या मोटारीवर दगड राष्ट्रवादीनेच मारला कशावरून?.

काहीवेळा असंही होतं की, बरेच जण स्वतःचंच नुकसान करून घेतात आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा घटना याअगोदर घडल्या आहेत. काय सांगता येतं..? मी विचारांची लढाई विचारांनी लढावी, असे माझं मत आहे.