टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 10 जून 2021 – आपण 22 वर्षांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून संघर्षाची भूमिका स्वीकारली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या 22 वर्षांचा आढावा आपण घेतोय, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या मुख्यालयामध्ये गुरुवारी (दि. १० जून) कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शरद पवार म्हणाले, या सर्व संकटाच्या कालखंडामध्ये आपण थांबलो नाही, डगमगलो नाही. आपण कोरोनाला सामोरे गेलो. शेवटच्या माणसापर्यंत अन्नधान्य पोहचेल याची आपण खबरदारी घेतलीय. सरकारचे कार्यक्रम राबवण्यात सगळे यशस्वी झालो.
यापुढे महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्याची कुवत असलेली एक पिढी आज राष्ट्रवादीमधून तयार होत आहे. त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम आपण केलं पाहिजे. या नेतृत्वाच्या फळीमागे सामान्य माणूस विश्वासाने उभा राहून त्यांची बांधिलकी कायम टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून मला स्वतःला राष्ट्रवादीच्या भवितव्याविषयी चिंता वाटत नाही.
यावेळी शरद पवार म्हणाले, आज एका वेगळ्या विचारांचे सरकार आपण स्थापन केलंय. कधी कुणाला पटलं नसतं की शिवसेना आणि आपण एकत्र काम करू शकू. पण, आपण ते केलं. पर्याय दिला व सुदैवाने तो पर्याय लोकांनी स्वीकारला. तिन्ही पक्षाच्या लोकांनी या पर्यायाच्या बांधीलकीतून योग्य रीतीने पावलं टाकायला सुरुवात केलीय.
परिणामस्वरूप हे महाविकास आघाडी सरकार उत्तम रीतीने काम करतंय. कुणी काहीही म्हणो, हे सरकार टिकेल व पाच वर्षे काम करेल. नुसतं ५ वर्षे नाही तर उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करून सामान्य जनतेत प्रभावीपणे देश आणि राज्यात प्रतिनिधीत्व करण्याचे हे सरकार काम करेल, याबाबत माझ्या मनात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
तुमची सत्ता ही अधिक हातांत गेली पाहिजे. सत्ता ही विक्रेंदित झाली. केवळ एकाच ठिकाणी सत्ता राहिली की ती भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर ती सत्ता अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे.
हे सूत्र आपल्याला मान्य असेल तर एससी, एसटी, ओबीसी या प्रत्येक घटकाला मी सत्तेचा वाटेकरी आहे, हे वाटले पाहिजे, ते कृतीमध्ये आणण्याची काळजी आपण घेतली पाहिजे, असं देखील शरद पवार म्हणाले.