टिओडी मराठी, पुणे, दि. 8 मे 2021 – उद्योग, व्यवसाय आणि व्यापारामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर, जिद्द, चिकाटी, मेहनत, संयम या बाबी असाव्या लागतात. याच जोरावर यशस्वी उद्योजक, व्यावसायिक आणि व्यापारी बनता येतं आणि ‘कीर्ती’ मिळविता येते. अशाचप्रकारे दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या खाद्यतेल उदयॊगात विष्णुदास भुतडा यांची ‘कीर्ती’ अफाट आहे. आज आपण ‘टिओडी मराठी. कॉम’च्या वतीने जाणून घेऊया, त्यांचा ‘कीर्ती’वंत उद्योजक प्रवास…
खाद्यतेल उदयॊगात ‘कीर्ती’ हे खूप नावाजलेलं नाव. मात्र, खाद्यतेल उदयॊगात ‘कीर्ती’ ग्रुप देशात कानाकोपऱ्यात पोहचला आहे. लातूरच्या उद्योग समूहाच्या कीर्ती गोल्ड’ ब्रँडचे जनक म्हणून विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब यांच्याकडे पाहिलं जातं. वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर जिद्दीने संघर्ष करून विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब यांनी आपली कारकीर्द घडविली. ‘कीर्ती गोल्ड’ या नावाने त्यांनी सुरू केलेला उद्योग आता चार राज्यांमध्ये हा ब्रँड बनून प्रसिद्ध आहे.
विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब यांचं जन्मगाव लातूर. ‘कीर्ती’ या उद्योगाने आता झेप घेत राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये आपले भव्य दिव्य प्रकल्प उभे केले असून कर्नाटकातील विजापूर येथेही प्रकल्प उभारलेला आहे.
विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब यांचा जन्म १९३० साली झाला. वडीलांचे नाव रामगोपाल तर आईचे नाव मथुराबाई. अहमदपूर तालुक्यातील अंजनसोंड या आजोळी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव निलंगा तालुक्यातील हलकी असे आहे. विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब हे पाच वर्षांचे असताना प्लेगच्या साथीत त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
आईने विष्णुदास आणि किसनप्रसाद या दोन्ही मुलांना लहानाचं मोठं केलं. विष्णुदास यांचं चौथीपर्यंत शिक्षण आजोळी झालं. पाचवीला शिक्षणासाठी ते लातुरामध्ये रामेश्वर आणि नारायणदास या चुलत्यांकडे आले. नारायणदास हे एका व्यापाऱ्याकडे मुनीम म्हणून काम करत होते. त्यांच्याकडे राहून विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब यांनी शिक्षण घेतले. त्यांचे शालेय शिक्षण आणि व्यापारी शिक्षण एकवेळीच सुरू झाले. चुलत्याच्या किराणा दुकानाची किल्ली त्यांच्याकडे असायची. त्यामुळे ते दुकानात बसत.
व्यापारी वृत्ती गप्प बसू देत नव्हती. लहानपणे विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब यांनी मिरची विकली. त्यांचं शिक्षणात रस होता. मुलगा हुशार म्हणून त्यांचा नावलौकिक होत होता. त्यावेळेस शिवराज पाटील-चाकूरकरजी आणि राजेश्वरराव पाटील-चाकूरकरजी हे बंधू विष्णुदास आणि किसनप्रसाद या दोन्ही भावंडांचे मित्र झाले होते.
गणित हा विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब यांचा आवडीचा विषय होता. मात्र, विष्णुदास यांना इंग्रजी विषयाने दगा दिला त्यामुळे पहिल्या प्रयत्नात मॅट्रिक गेली. पण, खचून न जाता त्यांनी को-ऑपरेटिव्ह ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण होताच ते उमरगा तालुक्याला सहकार खात्यात सुपरवायझर म्हणून काम करू लागले.
या दरम्यान मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले आणि विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब यांनी उस्मानाबाद डीसीसी बँकेत क्लार्क कम् अकाउंटंट म्हणून नोकरी करू लागले. तिथून जिल्हा मार्केटिंगमध्ये बढतीवर अकाउंटंट म्हणून प्रवेश केला.
या दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या वतीने रिजनल को-ऑप. ट्रेनिंग सेंटरमध्ये निवडक कर्मचाऱ्यांसाठी विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब यांना ट्रेनिंग पाठविण्यात आले. इंदौर येथे सहा महिने ट्रेनिंग करून उत्तम गुणाने उत्तीर्ण होऊन विष्णुदास यांनी आपल्या गुणवत्तेची प्रचिती दिली. तेथून आल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा मार्केटिंगचे मॅनेजर म्हणून काम पाहू लागले. त्यांनी जिल्हा मार्केटिंगला चांगले दिवस आणले.
आज डीसीसी बँका जेवढी उलाढाल करतात तेवढी उलाढाल ही संस्था करायची. चेअरमन शिवाजीराव नाडे आणि मॅनेजर विष्णुदास भुतडा या जोडीने जिल्हा मार्केटिंग शिखरावर नेलं. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देत त्यांनी स्वतंत्र उद्योगाला सुरुवात केली.
तोपर्यंत हैदराबादच्या विद्यापीठातून १९५९ साली इंजिनिअरची पदवी घेऊन लहान भाऊ किसनप्रसाद करिअरसाठी धडपडत होता. ऑईल मिल उभारायची हा जणू लहानपणापासूनच्या त्यांच्या संकल्प होता. हाच संकल्प सत्यात आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली.
प्रत्येकी अडीच हजार गोळा करून सात भागीदारांच्या सोबतीने त्यांनी ‘गणेश ऑईल मिल’ नावाने पहिल्या मिलचा श्रीगणेशा केला. दोन वर्षांत भागीदारीचे भाग.पडल्याने सारे विखुरले. पण, विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब यांनी राचप्पाजी हत्ते यांच्या सोबतीने हात्तेनगर येथे ऑईल मिल आणि शेंगा फोडून देण्याची मशिनरी आणून उद्योग सुरु केला.
लातूरमध्ये सुरू होत असलेल्या पहिल्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब यांनी ऑईल मिल उभारायचे ठरविले. मात्र, भांडवल अपुरे पडत होते. अशावेळी महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशनकडे प्रोजेकट सादर केला. त्याला एमएसएफसीने त्याला मंजुरी देत ६९ साली २४ हजारांचे अर्थसाहाय्य दिले. आणि कीर्ती उद्योग समूहाची ‘कमल ऑईल मिल’ ही पहिली शाखा सुरु झाली. यानंतर विष्णुदास यांनी मागे वळून पाहिले नाही. घेतलेल्या २४ हजारांची चुटकीसरशी परतफेड करून पुढे वाट धरली. हा उद्योग स्थिर होता त्यांना नव्या वाटा खुणावू लागल्या.
मित्र माणिकरावजी सोनवणे, रामचंद्र पल्लोड, बद्रीशेठबरोबर खत दुकान, कीर्तीकुमार, भारतलाल अडत दुकान, विष्णू इंजिनिअरिंग देशमानेंसोबत कीर्ती किराणा साखर आणि वनस्पती तेलाचे होलसेल, कीर्ती फूड प्रॉडक्ट, गोळ्या, बिस्किट ब्रेड कन्फेक्शनरी उत्पादन यांसह इतर काही व्यवसाय भागीदारीत सुरु केले. त्यांनी मेहुणे राजगोपाल मुंदडा यांनासुद्धा लातूरला व्यवसाय घालून दिला.
दरम्यान, विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब यांनी यांचा १९५८ साली गुलबर्गा येथील कमलादेवी यांच्याशी विवाह झाला. कालांतराने चार मुले आणि एक मुलगी असा परिवार झाला. विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब एकटे सर्व सांभाळत होते. अशावेळी १९७७ मध्ये चिरंजीव अशोक यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून उद्योगधंद्यात उतरले. १९८० मध्ये कीर्ती ऑईल मिल इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये ऑईल मिल सुरु केली. त्यानंतर दाल उद्योग विचारात आल्यानंतर
१९८७ ला कीर्ती उद्योग या नावाने दाल आणि तेल उद्योग उभारला.
विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब यांच्या दृढनिश्चयाच्या जोरावर कीर्ती ग्रुपचा पहिला सॉलवंट प्लांट आणि रिफायनरी ‘कीर्ती दाल मिल लि.’ या नावाने १९९४ ला सुरु झाला. त्यानंतर “कीर्ती सॉलवेक्स लि.’ या नावाने १९९८ ला तेल प्रकल्प उभारला. यातूनच नांदेडच्या कुसनूर या फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये पहिला कारखाना, सोलापुरात बोरामणीजवळ, कर्नाटकात विजापूर येथे तसेच स्व. विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते लातुरातील अँडिशनल एमआयडीसी आणि हिंगोली एमआयडीसीतही कौर्ती ग्रुपच्या अद्ययावत उद्योगाची उभारणी केली गेली.
देशातील सोयाबीन, सूर्यफूल या तेलबियांचे भाव विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब हेच ठरवू लागले. त्यांनी भविष्यातील अंदाज घेऊन शेतकऱ्यांना माल केव्हा विकावा? याचे मार्गदर्शन करत होते. शेतकऱ्यांना जास्त भाव देणारा उद्योग म्हणून विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब हे नावारूपाला आले.
आता सतीश, अशोक, कीर्ती आणि भारत ही मुले व्यवसायात लक्ष घालू लागली. विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब यांचे पुतणे डॉ. अलोक हे सध्या अमेरिकेत स्थाईक असून, अनिल हे मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. तर नातू आनंद, अर्जुन, अंकित हे सी.ए. उत्तीर्ण आहे. तसेच अजितने एम. बी. ए. केलं आहे. अरविंद शिक्षण घेत उद्योगात लक्ष देत आहे. सध्या सर्व नातू उद्योग समूहाच्या व्यवहारात लक्ष घालत आहेत.
मुलगी मीना तर मुले नितीन आणि मनीष सी. ए. झाले असून ते त्यांच्या उद्योगात मदत करत आहेत. नात अमृता हिचा विवाह डॉ. लव्हकुमार लोहिया (एम. एस. ऑर्थो.) यांच्यासोबत तर अर्पिताचा विवाह हैदराबाद येथील प्रसिद्ध होलसेल पेपर सप्लायर दीपक तापडिया यांच्यासोबत झाला आहे.
राधाकृष्ण मंदिर उभारणी तसेच इंडस्ट्रियल इस्टेट, अष्टविनायक, विराट हनुमानचे संचालक म्हणून विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब काम पाहतात. जिल्हा माहेश्वरी संघटना, आदर्श सोसायटी, लातूर ऑईल मिल असोसिएशनचे विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब माजी अध्यक्ष आहेत. एवढी ‘कीर्ती’वंत वाटचाल करीत असले तरी विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब हे अगदी साधेपणाने राहतात. हेच त्यांच्या यशाचं आणखी एक गमक म्हणावं लागेल.