औरंगाबाद: रस्त्याचे काम करत असताना जमिनी खाली असलेल्या विद्युत वाहिन्यांना कुठलेही नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्यावी लागत असते. अनेक वेळा रस्त्याचे काम करत असताना या वाहिन्यांचा अडथळा निर्माण होतो आणि वाहिन्यांचे नुकसान देखील होते. मात्र आता हे नुकसान होण्यापासून टाळता येणार आहे. यासाठी आधुनिक तंत्राचा वापर आता औरंगाबादयामध्ये करण्यात येणार आहे.
भूमिगत विद्युत वाहिन्या टाकताना रस्त्याचे खोदकाम करावे लागते. तेव्हा शहरात प्रथमच जीपीआर द्वारे सर्वेक्षण पद्धती वापरण्यात येणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पांडेय यांनी नुकताच यासंदर्भात निर्णय घेतला असून प्रायोगिक तत्त्वावर शहरातील एका भागात अशा सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले आहे.
या आधुनिक तंत्राद्वारे भूमिगत जलवाहिनी, मलवाहिनी, केबल कुठे आहेत, याची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर महावीर चौक ते दिल्ली गेट या व्हीआयपी रोडवर सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या तंत्राद्वारे संपूर्ण शहराचा अंडरग्राउंड नकाशा तयार करण्यात येणार आहे.
काय आहे जीपीआर तंत्रज्ञान ?
जीपीआर अर्थात ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार. या तंत्रज्ञानामार्फत जमिनीखालील वाहिन्यांच्या जाळ्याचे सर्वेक्षण केले जाते. नवीन विद्युत वाहिन्या किंवा जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजूला आडवा खड्डा केला जातो. अंडरग्राउंड ड्रिलिंग मशीनच्या माध्यमातून हा खड्डा केला जातो. आडवा खड्डा तयार केल्यानंतर जमिनीखालील ड्रेनेज लाइन, विद्युत लाइन, गटार व्हीआयपी रोडच्या खाली आढळून आल्यास त्यांना बाधा न पोहोचवता नवीन विद्युत वाहिनी टाकण्याचे काम केले जाते.