मुंई: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काल पार पडलेल्या सभेनंतर आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. नेस्को मैदान गोरेगाव मुंबई येथे पार पडलेल्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला आणि आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत महाविकास आघाडीला टार्गेट केलं आहे. आज पार पडलेल्या या सभेमध्ये हनुमान चालीसा पठण देखील करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
◆ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कालची सभा म्हणजे लाफ्टर सभा होती. त्यांच्याकडून नवे मुद्दे येतील अशी आशा होती परंतु शेवटपर्यंत लाफ्टर सभा होती.
◆ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष एकही भाषण विकासावर दिले नाही.
◆ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालीसा पठण करणे हा राजद्रोह आणि औरंगजेबाच्या कबरीवर माठा टेकवणे हा राजशिष्टाचार आहे.
◆ रामजन्मभूमी आंदोलनात तुम्ही नव्हता हे म्हणालो तर त्यांना मिरची लागली. 1992 साली नगरसेवक झालो, जुलैमध्ये वकिल झालो आणि डिसेंबरला नगरसेवक वकील देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेले होते. याचा मला अभिमान आहे. आम्ही संघर्ष करून आलेलो आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही.
◆ माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझे वजन कमी करू शकणार नाही. हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या ढाच्याला पाडल्याशिवाय शांत बसणार नाही.
◆ बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचे पोतं म्हणायचे पण त्याच पोत्यासमोर उद्धव ठाकरे नाक घासून मुख्यमंत्री झाले.
◆ वाघाचे फोटो काढले म्हणून वाघ होता येत नाही. बाळासाहेब ठाकरे वाघ होतेच पण आता या देशात सध्या एकच वाघ आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. सीमेपार जाऊन दहशतवाद्यांना ठोकुन काढणारे नरेंद्र मोदी हेच खरे वाघ आहेत.
◆ लाथ कोण मारतो हे सर्वांना माहिती आहे, खरा हिंदू ठोकर मारतो. तुम्ही आमच्याशी संसार केला. आमची संपत्ती घेऊन दुसऱ्यांशी लग्न केले. आमच्या नावावर मत मागितली आणि म्हणे एकतर्फी प्रेम म्हणतात. ऑफिशिअल डिव्होर्सही घेतला नाही.
◆ उद्धव ठाकरेंचे कालचे भाषण सोनिया गांधींना समर्पित आहे. जी भाषा कॉंग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात बोलते तीच भाषा काल उद्धव ठाकरे बोलले.
◆ काही मुद्दे नसले, तर मुंबईला तोडण्याचा मुद्दा शिवसेना काढते. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाचा बापही वेगळी करू शकत नाही. मुंबई आम्हाला वेगळी करायची आहे मात्र ती महाराष्ट्रातून नाही तर भ्रष्टाचारापासून वेगळी करायची आहे.
◆ तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचा एकच बाप आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
◆ मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांची बैठक ही आयपीएलच्या मॅचसारखी वाटते हा महाराष्ट्राचा अपमान आहे.
◆ जर तो सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर माझ्या मंत्रीमंडळात एकही वाझे, मलिक, देशमुख नसते. जर तशी वेळ आली असती तर आम्ही मंत्रिमंडळाला लाथ मारली असती.
◆ आता चिंतेचे कारण नाही आहे, लंकेचे दहन हे होणारच आहे कारण सगळी वानरसेना माझ्यासोबत आहे. मुंबई महानगर पालिकेवर भगवा फडकणारच आहे पण तो भगवा भाजपचा असेल.
या प्रमुख मुद्यांसह देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.