TOD Marathi

मुंबई : येत्या काही तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. ‘असनी’ चक्रीवादळ निवळले असून त्यामुळे मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असल्याने पुढील काही तासांमध्ये हा पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर धडक देण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

दरम्यान केरळमधील काही ठिकाणी मुसळधार ते खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.