संजय राऊत यांना काल रात्री उशिरा ईडीने अटक केली. या अटकेनंतर आज संजय राऊत यांना वैद्यकीय चाचणीसाठी जे जे रुग्णालयात आणल्या गेलं. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राऊत कुटुंबीयांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांशी उद्धव ठाकरे संवाद साधतील.
संजय राऊत यांना अटक होणं ही शिवसेनेच्या दृष्टीने आणि व्यक्तिशः उद्धव ठाकरेंच्याही दृष्टीने मोठी गोष्ट आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीपासून आजपर्यंत संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू ही कायम उचलून धरली.
रविवारी संध्याकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अटक होणार का? की चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडी त्यांना परत पाठवणार? अशा चर्चा होत्या. मात्र रात्री 1 च्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. यावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरे राऊत कुटुंबीयांसोबत भेटल्यानंतर काय बोलतात याकडेही आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.