TOD Marathi

मुंबई :

“जे जवळचे होते, त्यांनी धोका दिला पण या बंडाच्या संकटात माझ्या पाठीमागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी खंबीरपणे उभी राहिली. महाविकास आघाडी कुठेही फुटलेली नाही, एकसंघ आहे”, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. बंडखोर आमदार-खासदार सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे करत होते. (Shivsena Chief Uddhav Thackeray) पण आज विधान भवनात पार पडलेल्या बैठकीला हजेरी लावून महाविकास आघाडी अधिक ताकदीने भाजप आणि शिंदे गटासमोर आव्हान उभं करेल, असा निर्धारच जणू उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवत शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाही, असंही सांगितलं. म्हणजेच भाजप आणि शिंदे गटाविरोधात शिवसेना पक्ष ताकदीने महाविकास आघाडीबरोबर उभा असेल, (Shivsena will be a part of Maha Vikas Aghadi) अशी घोषणाच उद्धव ठाकरे यांनी केली.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना खिळखिळी झाली. अनेक विश्वासू आमदार खासदार गेले, सत्ता पालटली. पण अडीच वर्षांआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या महाविकास आघाडीचं नेतृत्व केलं, त्या आघाडीपासून फारकत घेणार नसल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली. मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच विधान भवनाची पायरी चढली. महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी ते विधिमंडळात आले होते. बैठक संपन्न झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? असा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, “आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं, हे जर तुम्हा सगळ्यांना सांगायचं असतं तर तुमच्यासमोरच बैठक घेतली असती ना.. बऱ्याच दिवसांनंतर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र भेटले, चांगल्या गप्पा झाल्या… विविध विषयांवर छानपैकी चर्चा झाली…”

“मविआ सरकार म्हणून जगावर आलेल्या कोव्हिडच्या संकटाचा आम्ही मुकाबला केला, त्याच्यापुढे बंडाचं संकट ते काय? जे जवळचे होते, त्यांनी धोका दिला पण या बंडाच्या संकटात माझ्या पाठीमागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी खंबीरपणे उभी राहिली. महाविकास आघाडी कुठेही फुटलेली नाही, एकसंघ आहे, पुढची काय रणनीती असेल, ते लवकरच स्पष्ट करु”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मला न्यायदेवतेवर विश्वास आहे, दोन गोष्टी सांगतो, न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी असते, पण त्याचवेळी जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असते. न्यायदेवता आणि जनता लोकशाहीचे आधारस्तंभ, जोपर्यंत हे दोन्ही घटक मजबूत आहेत, तोपर्यंत देशात लोकशाहीच राहिल, बेबंदशाही येऊ देणार नाही”

शिंदे फडणवीस सरकारच्या अस्तित्वावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आतापर्यंत तज्ज्ञांनी सांगितलंय, हे सरकार टिकू शकणार नाही, या सरकारच्या विरोधात कोर्ट निर्णय देईल, अशी अपेक्षा आहे.”