TOD Marathi

मुंबईः राज्यातलं सत्ता नाट्य, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, बहुमत चाचणी अशा घटनांनी राज्यातील राजकारण ढवळून निघालं. आता तर शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच बंडखोर आमदारांनी (Shivsena Rebel MLA) आपला दावा केला आहे. त्यामुळे शिवसेनेसह राजकीय वर्तुळात आता मोठी खळबळ माजली आहे. आता खरी शिवेसना उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांची की एकनाथ शिंदे यांची हा सवाल उपस्थित होत असतानाच शिवसेनेच्या चिन्हावर आता दावा करण्यात येत आहे.

हा संघर्ष टोकाला गेला असतानाच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या चिन्हाबरोबरच विधानसभा निवडणुका घेऊन दाखवा असं थेट आव्हानच त्यांनी बंडखोर आमदारांच्या गटाला दिला आहे. (Uddhav Thackeray challenged BJP and rebel MLAs)

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे, त्यांचा संघर्ष, शिवसेनेचा एकच असलेला आमदार ते अगदी छगन भुजबळ सोडून गेल्यापासूनचा संघर्ष सांगत धनुष्यबाणाविषयी आपले मत सांगितले. यावेळी धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेनेचेच असणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी विधिमंडळ पक्ष आणि रजिस्टर पक्ष याविषयीही आपलं मत मांडलं. धनुष्यबाण शिवसेनेचंच राहणार असल्याचही सांगितले. शिवसेनेतून बंडखोरी करून गेलेल्या आमदारांना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणि भाजपला हिम्मत असेल तर आता विधानसभा निवडणुका घ्या, असं थेट आव्हानच दिलं, त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाणाचा संघर्ष टोकाला जाणार हे आता स्पष्टच झालं आहे.