नाशिक | नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्री उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टोलेबाजी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “चांगलं काम केलं, लोकांना लाभ दिला, तरी काहींच्या पोटात दुखते. ‘शासन आपल्या दारी’ योजना कशासाठी? लोक कशासाठी जमा करता? असे सवाल काहीजण उपस्थित करतात. पण, लोकांना लाभ मिळतो म्हणून ते येतात. मग, तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय?”
हेही वाचा” …मला काकींना काहीही करुन भेटायचंच होतं; अजित पवार म्हणाले…”
“आता चिंता करण्याची गरज नाही. कारण, कोणाच्याही पोटात दुखलं तर, त्यावरील औषध देण्यासाठी डॉ. एकनाथ शिंदे यांना आम्ही आणलं आहे. त्यांचं पचनी पडलं नाहीतर अजित पवार आहेत. त्यामुळे सर्वांच्या पोटदुखीवरील उपचार आपण करणार आहोत,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे.
“यापूर्वीचे मुख्यमंत्री मला अर्थसंकल्प, सहकार, शेतीतलं काहीच कळत नाही असं सांगायचे. मग,शरद पवार यांनी पुस्तक लिहिलं. त्यात शरद पवारांनी म्हटलं की, उद्धव ठाकरेंना राजकारणातील काहीच कळत नाही. पण, आता असं नाही. आम्हाला राजकारण, अर्थसंकल्प, सहकार, शेतीतील माहिती आहे. म्हणून काळजी करू नका. आता जे निर्णय होतील, ते सामान्य माणसाचे होतील,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.