दिल्लीत Amit Shah – Devendra Fadnavis यांच्यामध्ये 2 तास चर्चा, सहकाराकडं अधिक लक्ष, गैरव्यवहाराची होणार चौकशी

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 17 जुलै 2021 – केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीमध्ये दाखल झाले होते. दिल्लीमध्ये पोहोचल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत सुमारे 2 तास चर्चा झाली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली आहे, असं समजतं.

अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या दोन तासांच्या बैठकीत राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहारावर चर्चा झाली आहे. येत्या काळात सहकार क्षेत्रातील गैरव्यवहाराची चौकशी आणखी सखोल होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे सूत्रांकडून समजते.

काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी महाराष्ट्र राज्यातील काही साखर कारखान्यांमध्ये गैरव्यवहार झालेत,असे सांगत अमित शहा यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर सहकार मंत्रालय हे अमित शहा यांच्याकडे आलं आहे. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतलीय.

त्यातही साखर कारखान्यांतील गैरव्यवहाराबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे, असे बोलले जात आहे.

अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांत राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा झाली आहे. अनिल देशमुख प्रकरणावरही चर्चा झाली असून या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

काल ईडीच्या अधिकाऱ्यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून ईडीने अनिल देशमुख यांची 4.2 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

Please follow and like us: