टिओडी मराठी, मुंबई, दि. 22 जून 2021 – मुंबई पोलिसांनी मंगळवारी टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट अर्थात टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध दुसरे आरोपपत्र दाखल केलं आहे. याप्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर ९ महिन्यांनी पोलिसांनी अर्णब गोस्वामींचे नाव आरोपपत्रात दाखल केलं आहे.
१,८०० पानांचे पुरवणी आरोपपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केलंय. ज्यात गोस्वामी आणि एआरजी आऊटलर मीडिया यांच्यासह आणखी ४ लोकांची नावे आहेत. यात पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांना दोषी ठरवले होते. ज्यात जीन ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) इंडियाचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीच्या सीईओ विकास खानचंदानी यांचा समावेश आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने २४ मार्च रोजी गोस्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर अटकेपासून मर्यादित संरक्षण दिले. याचिकेत पोलीस, विशेषत: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरूद्ध गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी याने केला होता.
रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील ‘व्हॉट्सअॅप’ संवादातून त्यांचा ‘टीआरपी’ घोटाळा उघडकीस आला. पोलिसांनी व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे तपास सुरु केला होता. त्यानंतर दासगुप्ता यांनाही अटक झाली होती.
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास बडतर्फ एपीआय सचिन वाजे यांनी केला होता. ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) कडून पैसे घेतल्याचा आरोप यावेळी केला होता.
अर्नब गोस्वामीविरोधामध्ये न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात ठाम पुरावे आहेत, असे गुन्हे शाखेचे मत आहे. या आरोपपत्रात व्हॉट्सअॅप चॅटचाही समावेश केला आहे.
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये टीआरपी कथित घोटाळा उघडकीस आल्यानंतर रेटिंग एजन्सी बीएआरसीने हंसा रिसर्च ग्रुप (एचआरजी) मार्फत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार काही टीव्ही चॅनेल्स टीआरपीचे क्रमांक वाढवत आहेत, असा आरोप करण्यात आला होता.