TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 16 जून 2021 – कोरोनामुळे अद्याप देशातील पर्यटन स्थळे देखील सुरु झालेली नाहीत. पावसाळ्यात धबधबे असलेल्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, यंदाही कोरोनामुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद केली आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद आणि पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.

पुणे शहरातली रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी ग्रामीण भागामध्ये मात्र अजून कोरोना रुग्ण सापडत आहेत. हे लक्षात घेता जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जायला जिल्ह्याबाहेरील नागरिकांना बंदी केली आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये नयनरम्य अशी पर्यटनेस्थळे आहेत. पावसाळ्यामध्ये दंड किल्ल्यांसह या पर्यटन स्थळांवर पर्यटक गर्दी करत असतात. पण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने काही बंधने घातली आहेत.

त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे पुणे जिल्ह्याबाहेरील नागरिकांना पुण्यातील पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश काढणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पोलीस सुरक्षा आणि बॅरिकेड लावणार आहेत. पुणे खोपोली आणि पुणे तळेगाव हायवे च्या टोलनाक्यावर फ्लेक्स लावणार आहेत. त्याठिकाणी पर्यटन स्थळांवर गर्दी टाळण्याच्या हेतूने बंदी घातली आहे अशी सूचना लावणार आहे” असे आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील अनेक भागामध्ये बाहेरून नागरिक पर्यटनाला येतात. पण, कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर बाहेरील नागरिकांना परवानगी नसणार आहे. त्यानुसार चेकपोस्टवर पोलीस बंदोबस्त ठेवणार आहे. ग्रामीण भागात स्थानिक नागरिकांची काळजी घेणे आवश्यक आहे.

त्या भागात आरोग्य सुविधाही अत्यल्प आहेत. त्यांचा कोरोनापासून बचाव होणे आवश्यक आहे. बाहेरील नागरिक त्यांच्या संपर्कामध्ये येऊन कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केलंय.