टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 24 ऑगस्ट 2021 – नागपूर समृद्धी महामार्ग कामाला कोरोनामुळे विलंब झाला आहे. तरीही सुमारे 55 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे शिर्डीपर्यंतच्या मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच नागपुरात केला.
यावेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या कमी वजनाच्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी 1100 रुपये टोल द्यावा लागेल, अशी माहिती एमएसआरडीडीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी नागपुरात दुपारी समृद्धी महामार्गाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्याच्यासोबत अनिल कुमार गायकवाड, निशिकांत सुखे, आमदार आशिष जयस्वाल, शिवसेना नेते किरण पांडव आदी उपस्थित होते. यावेळी गायकवाड यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या 2008 मधील मार्गदर्शक सूचनांनुसार टोल स्वीकारला जाणार आहे.
कमी वजनाच्या वाहनांसाठी 1.65 रुपये प्रति किलोमीटर इतका टोल आकारणार आहे. अवजड वाहनांसाठी हा टोल तीनपट असणार आहे. या मार्गावरील वाहने प्रतितास 150 किलोमीटर वेगाने धावतील. या संपुर्ण प्रकल्पाचे 70 टक्के तर शिर्डीपर्यंत 79 टक्के काम झाले असून या कामावर 35 हजार कामगार आणि 5500 मशिन्स कार्यरत आहेत, असे गायकवाड यांनी यावेळी सांगितले आहे.