TOD Marathi

कोरोनावर उपचारासाठी नेजल स्प्रेचा होणार वापर; नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी

नागपूर: कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्लेन्मार्क कंपनी औषध तयार करत आहे. नाकाद्वारे घेण्याच्या नेजल स्प्रेची चाचणी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांवर याची चाचणी करण्यात येणार आहे.

कोरोना प्रतिबंधक लस आली असून लसीकरण सध्या सुरु आहे. आता कोरोनावर प्रभावी औषध तयार करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अशातच ग्लेन्मार्क कंपनी सध्या एक स्प्रे तयार करत आहे. नाकाद्वारे घेण्याचा नेजल स्प्रे कोरोनावर प्रभावी ठरू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ग्लेन्मार्क कंपनीने विकसित केलेला स्प्रे सध्या चाचणीच्या पातळीवर असून नागपूरात कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर या नेजल स्प्रेची चाचणी केली जाणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसिन विभागामार्फत महाविद्यालयातील रुग्णालयात या स्प्रेची क्लिनिकल ट्रायल होणार आहे.