टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 26 जून 2021 – करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात कहर केला होता. आता करोनाची तिसरी लाट येणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात करोनाचा अतिघातक डेल्टा प्लस विषाणू भारतात आढळला आहे. त्यामुळे करोना लसीकरण वेगाने करण्यावर भर दिला जाणार आहे. म्हणून अनेक लशींना मान्यता दिली जात आहे. यातच जुलैमध्ये सिंगल डोसवाली ‘जॉन्सनची’ लस मिळणार आहे.
जुलै महिन्यात जॉन्सन अँड जॉन्सनच्या करोना प्रतिबंधक लसीला भारतात परवानगी मिळणार आहे. सुरुवातीला या लसीचे १ हजार डोस उपलब्ध होणार आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनच्या करोना लसचा केवळ सिंगल डोस घ्यावा लागणार आहे. ही लस सुमारे 1850 रुपयापर्यंत उपलब्ध होणार आहे.
देशात जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीची खऱेदी खासगी क्षेत्राच्या माध्यमातून कऱणार आहे. खासगी क्षेत्र अत्यंत कमी प्रमाणात या लसीचे डोस खरेदी करू शकणार आहेत. तर लस खरेदीसंदर्भात सरकारकडून अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नाही.
सध्या भारतात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पूटनिक व्ही लस दिली जात आहे. तर फायझर लसीबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आता लवकरच फायझरची करोना प्रतिबंधक लसही भारतात उपलब्ध होणार आहे, असे देखील सांगितले जात आहे.