नवी दिल्ली: जीएसटीच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा एकदा मतभेद दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. १७ सप्टेंबर रोजी जीएसटी संदर्भात मोठी बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी काही वक्तव्य केली आहेत.
पत्रकारांशी बोलत असतांना पवार म्हणाले की, कर प्रणालीसंदर्भात केंद्राने आहे तीच पद्धत पुढे सुरू ठेवावी. तसेच, केंद्रानं केंद्राचं काम करावं. केंद्रानं केंद्राचे कर लावण्याचं काम करावं. परंतु राज्यांच्या अधिकारांवर कोणत्याही प्रकारे गदा आणता कामा नये. हे अधिकार कमी करता कामा नये. आपल्याला उत्पन्न देणारे जे विभाग आहेत, त्यात मुद्रांक शुल्क, उत्पादन शुल्क आणि सर्वात जास्त जीएसटीमधून कर मिळतो. त्यामुळे जे ठरले, त्याच पद्धतीने पुढे चालू ठेवावं असं आमचं म्हणणं आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, जीएसटीची बैठक लखनऊ ला त्यांनी ठेवली. आम्ही त्यांना विनंती करत होतो की दिल्लीतच ठेवा. पण त्यांनी एकलं नाही. जीएसटी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली लखनौमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीमध्ये यासंदर्भात सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.